You are currently viewing कणकवलीत २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार

कणकवलीत २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार

मतमोजणी काळात मोठा पोलीस बंदोबस्त

कणकवली :

कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघात ६ टेबलवर टपाली, तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मत मोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये ही मत मोजणी होणार आहे. यासाठी ११६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली विधानसभेचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.

मत मोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कणकवली महाविद्यालयात व परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कणकवली मतदार संघात एकूण ३३२ मतदान केंद्रे असून, यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होताना, प्रत्येक ठिकाणी ३ कर्मचारी व टपाली मत मोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी व इतर ५० कर्मचारी मिळून ११६ कर्मचारी काम पाहणार आहेत. एका फेरीत १४ केंद्रांची मत मोजणी होणार आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकारी असणार असल्याचे निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.

भाजपा महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात खरी लढत पाहायला मिळणार आहे.

या मत मोजणीसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल परिसरात महायुतीचे उमेदवार विद्यमान आ. नितेश राणे व कणकवली नगरपंचायत रोड परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष उमेदवार गणेश माने आणि कणकवली तहसील कार्यालय येथे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी, बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, २ दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा