*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम ललित लेख*
*वेगळेपण*
(ललित)
हल्ली ती जरा आळसावली होती. बरेचदा ऊत्साहच वाटत नसे. झोपुन रहावेसे वाटे. हा आळशीपणा झटकायचा तिने चांगलाच प्रयत्न केला.
दोन चार दिवसात तिला ऊठल्यावर नेहमीचेच पण काही वास ऊग्र दर्पासारखे वाटायचे.
नकोसे झाले ते वास. हे काय आणि?
एक वेगळेपण जाणवायला लागले.काही भास, जाणिवा नकळत जाणवत.
जेव्हा एक दिवस नकोशा वासाने मळमळू लागले व ती एकदम सावध झाली. तिने स्वत:शीच ऊलट तपासणी घेतली व हळूच लाजली, हंसली, घाबरली.
फक्त तिलाच समजलं होतं कि, तिच्या मनात कोणीतरी अगदी सहज शिरलंय.. दडलंय.
हे कोण बरं आपल्या नकळत लपलं येऊन.
काही काही खावेसे वाटे.नको त्या गोष्टी कराव्याशा वाटत.
आता आणि काय काय भास होणार आहेत काय माहित?
पण वेगळेपण आहेच आणि ते फक्त तिलाच समजत होते.
त्याची तिला गंमत वाटू लागली.
सकाळी ऊठता ऊठता ती रात्रीचं स्वप्न आठवत होती. आठवली तिला ती गोबर्या गालाची , लाल गोरी छोटीशी बाहुली . काळंभोर जावळ भुरभुरत होतं. तिच्याकडे छान हंसत होती.
खुपच म्हणजे खुपच तिला आवडली.
ही दडली आहे का माझ्या काळजात!
आता ही नाजुक कळी किती जिवापाड जपायची बाई!
हे सगळं तिला कळता कळता हंसायला यायचं.
कसं अलगद् घडलं हे! गंमत वाटली.
आपलं असंच निश्चित कोणीतरी मनात शिरलं… काळजात दडलं… कसं सांगायचं कोणाला!
ती जुईच्या कळी सारखी नाजुक ,हंसरी, लाजरी सतत आसपास दिसू लागली. एकमेकींचा अंदाज घेत. कधी खूप झोपावेसे वाटे. कधी रडावेसे सुद्धा वाटे.
आईच्या मांडीवर झोपावेसे वाटे. हे कसलं वेगळेपण आहे. विचारावेसे वाटे.
थांबवता येत नव्हते. नाहीतरी ती गोबरी परी हवीहवीशीच वाटत होती.
आता घरातही सगळ्यांच्या लक्षात आलं आणि घर आनंदात हंसू खेळू लागलं.
तिची काळजी घेऊ लागलं. तिचं हवं नको ते पुरवू लागलं .
ती लाजून अर्धमेली व्हायची.
पौष्टीक खाणं.. दूध.. फळं .खाते ना?आराम थोडा व्यायाम करते ना? आग्रह चालू झाला.
एक दिवस पोटात ठोके ऐकू आले. थोडी हालचाल झाली आणि परि तिला हातातच आली असं वाटू लागलं.
तिचे लक्ष वेधुन घ्यायची, ढूशा मारत तिची जाणिव घ्यायची.
तिलाही तिच्या हालचालीचा छंदच लागला. शांत झाली ती की ही पोटावर हात फिरवायची. कि परी हळूच लाथ मारत प्रतिसाद द्यायची., आणि ही हंसायची.हरखुन जायची.
जडत्व ,झोप, आळस वाढतच गेलं. हालचाल चालणं संथ झालं.
ती परी मात्र त्याच रुपात डोळ्यासमोर असायची. दोघींची ओळख तर पटली होती. आता भाषा सुद्धा समजत होती. स्पर्श आवाज ओळखीचा झाला होता.
ती परिशी छान गप्पा मारायची. काय आवडतं .. काय हवंय विचारायची आणि ती शांतपणे ऐकायची.
रोजच हालचाल जाणिवा स्पर्श, माया भाषा एकमेकींसाठी वेगळंच पण हवंहवंसं होतं.
घरात परी यायची तयारी सुरू झाली . दुपटी झबली ,टोपरी शिवली… मोजे स्वेटर विणले,
खेळणी आली. पाळण्याची चौकशी झाली.
डोहाळ जेवणं कौतुकाची सुरू झाली.
प्रत्येकाच्या बोलण्यात परीचेच कौतुक व आतुरता होती कारण तिला परी हवी होती.
शिवलेल्या विणलेल्या आणलेल्या सर्व गोष्टीत तिची परी तिला सुंदर दिसायची.
एका सुमूहूर्तावर तीला दवाखान्यात नेलं.
वेदनानी कळवळली पण तिला परी पाहायची होती.
जेव्हा परीचा रडण्याचा आवाज सगळ्या दवाखान्याने ऐकला तेव्हा ती भानावर आली. तोच आवाज गेले अनेक दिवस ती ऐकत आली होती. एकटीच मनातल्या मनात तोच आज खराखुराऐकला.
थोड्याच वेळात दुपट्यात गुंडाळलेली परी तिच्याजवळ आणली तेव्हा तिला ती अगदी तश्शीच दिसली जशी रोज आसपास दिसायची.हंसरी गोबरी, लाल गोरी काळं दाट जावळ .
घरी आकाश ठेंगणं झालं होतं. नविन पाहुणी घरी कायमची आली होती.
तिने जवळ घेताच परीनेही ओळखलं व तिला चिकटली.
इतके दिवसाचा भास, वेगळेपण बदल सारे काही ओंजळीत साक्षात समोर दिसत होते. भरभरून पान्हा फुटला अन् परी तिला चिकटलीच.
कसं काय पण भाषा, स्पर्श माया आवाज एकमेकींना समजत होती.
दोघींची गट्टी जमली.
घरी परीला राजकन्येसारखं थाटामाटात कसं आणायचं, घर कसं सजवायचं, रोषणाई करायची. कपडे कसे घालायचे… ही तयारी व त्या दोघींची काळजी घेणे यात दिवस झट्कन संपत होता.
आता हे पहिल्यांदा ‘आई’. होणे.. आईची माया… मातृत्व. याची नवीनच प्रचिती येत होती.
आता त्या दोघींचा सहप्रवास अंतापर्यंत न थांबणारा असा चालू झाला.
दोघी एकमेकींची जपणुक, काळजी घेणे, ममतेची देवघेव या ची जाणिव घेत मार्गी लागल्या.
अनुराधा जोशी.
अंधेरी .६९
9820023605