सावंतवाडी :
मागच्या आठवड्यात दोन दुःखद प्रसंग घडले. पंचम खेमराज कॉलेजमधल्या माझ्या दोन मैत्रिणीं मंगल प्रभुसाळगावकर आणि मेघा पावसकर यांचेवर दुःखद प्रसंग ओढवला. आम्ही सगळे परवाच्या दिवशी त्यांना भेटायला गेलो होतो. मेघा सावरलेली दिसली आणि ते साहजिकच होतं, कारण मेघाच्या वडिलांचे वय ९० वर्ष होते. तिला तसे पितृप्रेम पुरेसे लाभलेले; पण मंगल वरचा प्रसंग हा मोठा होता. तिच्या ३४ वर्षाच्या मुलाचं निधन झालेलं. त्यांच्या घरी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की, त्या मुलाला कोणताच आजार नव्हता. त्याला कोणत्याही गोळ्या चालू नव्हत्या. अलीकडेच त्याचं संपूर्ण चेकिंग झालं होतं अन् त्यामध्ये देखील कोणताच दोष आढळला नव्हता. तरी देखील झोपेत त्याचं हृदयविकाराने निधन झालं.समोर व्हिजन हॉस्पिटल होतं, घरात डॉक्टर भाऊ होता.त्याचे वडीलही डाॅक्टर. पण तरी देखील कुणी काही करू शकले नाहीत.
काय कारण असेल त्याच्या जाण्याचं? ह्या सगळ्या प्रसंगाकडे बघताना असं वाटलं की, कदाचित, हां कदाचित मनावर ताण असेल. अर्थात हे आपलं आमचं मत. अलिकडे मुलांना फारच ताण जाणवतो. आमच्यावेळी बरं होतं. आमच्या पिढीला एवढा ताण घ्यावा लागला नाही. तसंच एकत्र कुटुंब ही होतं सावरण्यासाठी. आजची पिढी मात्र अतिशय तणावाखाली दिसते. पैसे मिळतात, परंतु डेडलाईन सांभाळण्यात त्यांच्यावर फार ताण येत असेल, असे वाटते.
यासाठी मुलांना तणावापासून दूर राहण्याचं शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे मला वाटते. ध्यानधारणा हा त्यासाठी उत्तम उपाय असावा, असं माझं मत आहे. आम्ही आजगावला एक ध्यान वर्ग चालवतो. आतापर्यंत त्याचे १३ वर्ग झालेत आणि आता १४ वा आहे. ध्यान हे तसं म्हटलं तर सोपं आहे, पण पचायला अवघड आहे. ध्यानधारणेविषयी अनेक जण आपापल्या परीने सांगतात. जे. कृष्णमूर्ती, विमला ठकार, ओशो तथा आचार्य रजनीश यांचे या संदर्भात भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे. नेटवर देखील चांगली माहिती मिळू शकते .आपल्याला योग्य ती स्विकारून त्याप्रमाणे आपण आचारण करू शकतो. माझं ठाम मत आहे की, जीवन सुसह्य होण्यासाठी आपण थोडा तरी वेळ ध्यानधारणा केली पाहिजे आणि मुलांना तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे; जेणेकरून तणावमुक्तीकडे एक पाऊल पडेल.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802.