You are currently viewing सावंतवाडीत दुरंगी लढत..

सावंतवाडीत दुरंगी लढत..

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

*नाम.दिपक केसरकर आणि विशाल परब यांच्यात चुरस झाल्याची चर्चा*

 

सावंतवाडी विधानसभेची निवडणूक यावेळी महाराष्ट्रभर गाजली ती महायुतीचे उमेदवार नाम.दिपक केसरकर यांच्या विरोधात एकवटलेल्या तीन उमेदवारांमुळेच. नाम.केसरकरांनी मतदारसंघात विकास केला नसल्याचे सांगत प्रत्येक उमेदवाराने आमदार होण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत उतरून केसरकरांच्या समोर आव्हान उभे केले होते. राजकीय खेळी करताना विशाल परब यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव मधून सावंतवाडीत आपले बस्तान हलविले. चराठा ग्रामपंचायत हद्दीत घर बांधून सावंतवाडी वासिय झाले. त्याचबरोबर मतदारसंघात विविध करमणुकीचे कार्यक्रम राबवून, अँब्युलन्स लोकार्पण सोहळा करून थेट जनतेच्या हृदयात उतरण्याचा देखील प्रयत्न केला. राजन तेली यांनी कणकवली शहर सोडून सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात आपले निवासस्थान उभारले आणि सावंतवाडीकर झाल्याचे दाखवत आपण बाहेरचा उमेदवार नसल्याचे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पुणे शहरात राजकीय इनिंग सुरू केलेल्या अर्चना घारे यांनी माहेरी सावंतवाडीत येत “मी सावंतवाडीची लेक” असल्याचे सांगत तब्बल सात आठ वर्षे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले अन् आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. शिवसेना(शिंदे गट) विरुद्ध शिवसेना(उबाठा) अशी चुरशीची लढत होईल अशी शक्यता असताना केसरकर यांच्या विरोधात बंड करत भाजपाचे युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष विशाल परब निवडणुकीत उतरले तर राजन तेली हे आयत्या बिळात नागोबा झाले म्हणत अर्चना घारे यांनी त्यांच्याशी उघड बंड केले. परंतु या सर्व रणधुमाळीत “तन मन” ऐवजी “धन” श्रेष्ठ ठरल्याने सावंतवाडीत राजन तेली यांच्यापेक्षा विशाल परब श्रेष्ठ ठरल्याने नाम. दिपक केसरकर आणि विशाल परब यांच्यातच चुरशीची लढत होणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

सावंतवाडी मतदारसंघात दिपक केसरकर यांना सुरुवातीला भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध होता. परंतु राज्यात महायुती असल्याने आणि वरिष्ठांचे आदेश यामुळे भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांना दिपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मागील लोकसभेच्या निवडणुकीत केसरकर यांनी खास.नारायण राणे यांच्यासाठी जीव तोडून मेहनत घेतली होती. त्यामुळे राणे कुटुंबीयांनी केसरकरांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचेच असा निर्धार केल्याने आणि तशा प्रेमळ व दणकेबाज सूचना कार्यकर्त्यांना दिल्याने भाजपा कार्यकर्ते केसरकरांसाठी मैदानात उतरले आणि ही विधानसभेची निवडणूक केसरकर यांच्यासाठी काहीशी सोपी झाली. केसरकरांचा विजय हा खास.नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेना व भाजप कार्यकर्ते एकवटले आणि नियोजनबद्ध रित्या मतदान होऊन निवडणूक पार पडली.

सावंतवाडी सहित इतर तालुक्यात दिपक केसरकर यांच्या बुथवर कार्यकर्ते घोळक्याने दिसत होते तर उबाठाच्या बुथवर तुरळक गर्दी होती. विशाल परब यांनी सर्वत्र बूथ लावले होते परंतु त्यांचा प्रचार हा घरोघरी थेट भेट पद्धतीने झाल्याने मतदारसंघात नाम.केसरकर आणि विशाल परब यांच्यामध्ये चुरस होईल अशीच चर्चा गावोगावी रंगत असल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेचे राजन तेली यांनी अचानक तिकिटासाठी भाजपा मधून उबाठा शिवसेनेत उडी मारल्याने शिवसेनेचेच काही कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज होते. उबाठा शिवसेनेचे काही पदाधिकारी तर पक्षत्याग करून दुसऱ्या पक्षात गेले होते. त्यामुळे तेली यांच्या प्रचारात खुद्द जिल्हाध्यक्ष आणि माजी तालुकाध्यक्ष हे देखील मनापासून उतरलेले दिसले नाहीत. परिणामी राजन तेली यांच्यामागे शिवसेनेची पारंपरिक मते असून देखील ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या (श पा.) अर्चना घारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादीचे जनाधार नसलेले, आणि मतदारसंघाशी देणेघेणे नसलेले नेते जरी तेलींच्यासोबत राहिले तरी राष्ट्रवादीची कट्टर मते अर्चना घारेंच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. भाजपा मधून निलंबित झालेले विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून दिपक केसरकर यांच्या समोर आव्हान उभे केले. परंतु सुरुवातीला भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींची ताकद पाठीशी असताना त्यांचा उधळलेला वारू रवींद्र चव्हाण व नितेश राणे, नारायण राणे यांची सावंतवाडी भेट व कार्यकर्त्यांशी झालेली चर्चा यानंतर काहीसा रोखला गेला. परंतु आर्थिक ताकदीच्या जोरावर त्यांनी गावागावात तरुण कार्यकर्त्यांचे जाळे विणले आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केल्याने राजन तेलींपेक्षा विशाल परब यांचे पारडे जड दिसले.

एकंदरीत सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघात “काटे की टक्कर” होणार असली तरी नाम.केसरकर आणि विशाल परब यांच्यात खरी लढत होईल अशीच चिन्हे मतदारसंघातील लोकांच्या चर्चेतून दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा