किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत ; आता प्रतीक्षा २३ तारखेच्या निकालाची
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार न घडता कडेकट पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील सर्व ९२१ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांत उत्साहाचं वातावरण होते. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६७.६० टक्के मतदान झाले. सायंकाळी उशिरा सुद्धा मतदान केंद्रावर रांगा दिसून येत होती. सायंकाळी मतदान संपले तेव्हा सुमारे ७२ टक्के मतदान झाल्याची प्रार्थमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली, अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल अशी माहिती देण्यात आली. किरकोळ मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना वगळता मतदान नीटपणे पार पडले.
काल सकाळी तीनही मतदारसंघात उत्साहात सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कणकवली मतदार संघात ६७.४६ टक्के, कुडाळ मतदारसंघात ६८.८५ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ६६.५६ टक्के मतदान झाले. यामध्ये ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारांपैकी ४ लाख ५८ हजार ९५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ लाख ३४ हजार ३०८ पुरुष आणि २ लाख २४ हजार ६४७ महिला मतदारांचा समावेश आहे. शेवटच्या एका तासात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मतदारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे शेवटच्या तासाभरात सुद्धा मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसत होत्या.
मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासन सुद्धा तत्पर होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी जिल्हयातल्या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान होत असताना या निवडणुकीत केव्हा नव्हे ते मुंबईला असलेले मतदार मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले. ज्या पद्धतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये रेल्वे स्टेशन तुडुंब गर्दीने फुलून जाते तसेच काहीसे चित्र यावेळी निर्माण झाले. यामध्ये तरुण मतदार वर्गाचा मोठा सहभाग होता. सिंधुदुर्गाच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेमध्ये ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे घुसून रेल्वे प्रवासी हे मतदाना करीता जिल्ह्यात दाखल झाले होते.