You are currently viewing महिलांनी कायद्यांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक – अँड. अमृता मोंडकर

महिलांनी कायद्यांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक – अँड. अमृता मोंडकर

मालवण

आज महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहे. महिला व मुलींना संरक्षण तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, पोटगी कायदा, घटस्फोट कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कायदे देशात अस्तित्वात आहेत. त्यामुळे महिलांनी या कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲड. सौ. अमृता मोंडकर यांनी पोईप येथे बोलताना केले. बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत पोईप येथे “कायदेविषयक मार्गदर्शन व जाणीवजागृती” आणि “महिला व आरोग्य” या विषयांवर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाट्न पोईपचे सरपंच सौ. गिरीजा पालव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले. यात त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती करून दिली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ॲड. अमृता मोंडकर व डॉ. गार्गी ओरसकर या उपस्थित होत्या. कौटुंबिक सल्ला केंद्राची कार्यपद्धती याबाबत सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोजकुमार गिरकर व अदिती कुडाळकर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली. यामध्ये केंद्रात दाखल होणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या, त्या समस्या सोडविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याविषयी महिलांना माहिती देण्यात आली. ॲड. मोंडकर यांनी “कायदेविषयक मार्गदर्शन व जाणीवजागृती” याविषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यामध्ये ॲड. मोंडकर यांनी, महिलांसाठी असणारे कायदे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गार्गी ओरसकर यांनी “महिला व आरोग्य” या विषयावर उपस्थित महिला वर्गाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, महिलांनी सकस आणि पोषक आहार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्याला ज्यातून जीवनसत्व मिळतील त्या पदार्थांचा वापर आपल्या रोजच्या आहारात करणे गरजेचे आहे. तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे, तसेच योगा, ध्यान यांचाही वापर करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्यावतीने गोळवण येथे नव्यानेच सुरु झालेल्या “जीवनज्योती” या ग्रंथालयास शुभेच्छापर पुस्तकांची भेट देण्यात आली. सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर व साने गुरुजी वाचन मंदिर या ग्रंथालयाचे लिपिक संजयकुमार रोगे यांच्या हस्ते जीवनज्योती ग्रंथालय गोळवणचे पदाधिकारी सिद्धेश चव्हाण यांना देण्यात आली. या कार्यक्रमास मसदे चुनवरे ग्रामपंचायत प्रशासक संजय गोसावी, पोईप गावचे सरपंच सौ. गिरीजा पालव, ग्रामसेवक अशोक गरकळ, समुह संसाधन व्यक्ती (सी. आर. पी.) सौ. सोनिया चव्हाण, कौटुंबिक सल्ला केंद्र मालवणचे समुपदेशक मनोजकुमार गिरकर, अदिती कुडाळकर, सेवांगण कर्मचारी सौ. वैष्णवी आचरेकर, संजयकुमार रोगे, निरंजन अवसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मनोजकुमार गिरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा