कुडाळ-मालवणसाठी १८०० कर्मचारी २७९ मतदानकेंद्रावर रवाना….
कुडाळ
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामध्ये कुडाळ मालवण मतदार संघातील २७९ मतदान केंद्रांवर आज निवडणूक साहित्य रवाना करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १८०० कर्मचारी यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना झाले. यावेळी मतदान निरीक्षक प्रवीण कुमार थिंड यांनी भेट घेत आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, वर्षा झालटे, शीतल जाधव आदी उपस्थित होते.
यासाठी ४३ एसटी बस व ४५ जीप गाड्यांच्या
माध्यमातून हे साहित्य रवाना करण्यात आले.मतदान केंद्र घेऊन जाण्यासाठी कुडाळ तालुक्यात २२ तर मालवण तालुक्यात २ अशा २४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १ हजार २३२ निवडणूक कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर दोन असे एकूण ५५८ पोलीस कर्मचारी या वाहनातून आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. कुडाळ-मालवण मतदारसंघात मालवण तालुक्यात १ ते १२२ आणि कुडाळ तालुक्यात १२३ ते २७९ क्रमांकाची मतदान केंद्र आहेत. कुडाळ मालवण मतदार संघात एकूण २ लाख १७ हजार १८६ मतदार असून त्यात महिला मतदार १ लाख ९ हजार २२१ आणि पुरुष मतदार १ लाख ७ हजार ९६४ तर एक तृतीयपंथी मतदार आहे.