*अखेरच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेसोबतच;*
*माझ्या पाठीमागे अदृश्य शक्ती; विशाल परब*
सावंतवाडी :
माझ्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा दावा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी केला. तुमच्यासाठी मी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. खुर्च्या लावल्या. काय नाही केलं, पण मी आता डगमगणार नाही. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची आहे. त्यांनी ठरवलंय, त्यामुळे २३ नोव्हेंबरला गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वासही विशाल परब यांनी व्यक्त केला.
विशाल परब यांची सावंतवाडी शहरात भव्य रॅली झाली. शहरातील गवळीतिठा येथून निघालेल्या रणरणत्या उन्हातील रॅलीला जगन्नाथराव भोसले उद्यानात विशाल परब यांनी संबोधित केले.
सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. सामाजिक जाणवेतून काम करत असताना राजकारणात आलो. वाटलं काहीतरी जनतेच्या हिताचं करावं,ते करत असताना ज्या नेत्यांसाठी काम केलं, तेच मला बदनाम करू पहाता आहेत. ते महान नेते आहेत. मी उत्तर देणार नाही. पत्रकार मला सारखे प्रश्न करत असतात. पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर २३ नोव्हेंबरला मतदारसंघातील जनताच देईल.
माझ्या व्यासपीठावर कुणीही बडे नेते नाहीत, सर्वसामान्य जनतेने मला प्रेम दिलंय, माझ्या उद्योग व्यवसायामुळे मी खूप चांगलं जीवन जगतोय, आमदारकी मला स्वतःसाठी नकोय, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवकांना सक्षम बनवायच आहे. विकास हाच माझा ध्यास आहे.
सामाजिक जाणिवेतून काम करत असताना, लोकाग्रहास्तव मी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलो आहे. निवडणूक न लढविण्यासाठी खूप प्रयत्न झाले.
धमक्या आल्या, माझ्यासोबत च्या सहकार्यांना माझ्यापासून दूर केलं गेलं. पण लक्षात ठेवा, अखेरच्या श्वासापर्यंत मी जनतेसाठीच काम करणार आहे.
पंधरा वर्षे तुम्ही या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत, मग तुम्हाला का फिरावे लागतं मतांसाठी? असा सवालही विशाल परब यांनी केला.