You are currently viewing चमच्यांची महती…

चमच्यांची महती…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चमच्यांची महती…*

 

चमच्यांची हो महती किती सांगू मी तुम्हाला

उठसुठ मागे मागे नाही धरबंध तोंडाला

लाळ गळते ती किती नाही लाज नि शरम

पोळी भाजतात रोज स्वार्थाचीच ते गरम…

 

चाटूपणा किती किती पाहताच ये शिसारी

मागे मागे फिरतात हे तर अट्टल भिकारी

बांडगुळे ही झाडांची शोषण करून जगती

बिलगती झाडाला नि करती झाडांची दुर्गती..

 

रक्तपिपासू जमात दूर रहावे या पासून

पाय घालती पायात खाती आयते बसून

जात कोडग्यांची पहा सदा हासती लाचार

नाही स्वाभिमान मनी यांचे जिणेच भिकार…

 

परस्वाधिन हो जिणे नाही वकुब काडीचा

झेंडा धरावा हो हाती रोज चालत्या गाडीचा

जिथे भाजेल हो पोळी तिथे लागती जळवा

जाती सोडून हे केव्हा नाही भरोसा धरावा…

 

जिथे दिसेल हो तूप तिथे बुडती चमचे

तूप संपताच पहा नाही होणार तुमचे

केव्हा मारतील लाथ केव्हा सोडतील साथ

लाचार नि लाळघोटी निलाजरी ही जमात..

 

दूर ठेवा हो चमचे बदनाम ते करती

तोंडावर गोड गोड खिसे आपुले भरती

गोड गोड जो बोलतो पोटी छद्म असे त्याच्या

फटकळ परवडे हे तर करतात लोच्या..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा