You are currently viewing सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची अलोट गर्दी 

सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची अलोट गर्दी 

सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची अलोट गर्दी

सावंतवाडी

महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात संपन्न होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली माऊलीच्या जत्रौत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविकांनी गर्दी केली आहे.

जत्रौत्सवानिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी व देवीची ओटी भरण्यासाठी शेकडो भविकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर रांगेने भक्तांना प्रवेश देण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.

मात्र, पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येत आहे. भाविकांनी बायेच्या चरणी ओटी भरून आपला नवस फेडला. यावेळी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.

माऊलीच्या प्रांगणात जत्रौत्सवा निमित्त हॉटेल, दुकानेही मोठया प्रमाणात उभारलेली आहेत. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले आहेत. कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली आहेत. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांचाही भरणा दिसून आला. थंडीचे दिवस असूनही आईसक्रीम पार्लरची संख्याही मोठया प्रमाणात आहे. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती. याठिकाणी भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. एकूणच माऊलीच्या प्रांगणात संपन्न होणाऱ्या या जत्रोत्सवात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा