अनुचित प्रकार रोखण्यासाठी सागरी किनाऱ्यावरील गस्त वाढवा – केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद
- राज्य सीमेवरील वाहनांची कडक तपासणीचे निर्देश
- रेल्वे स्थानकांवर यंत्रणा कार्यान्वित करावी
- अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवावे
सिंधुदुर्गनगरी
: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी गोवा कोस्टल गार्ड आणि जिल्हा पोलिस यांनी संयुक्त पथक स्थापण करावे. हे संयुक्त पथके सागरी क्षेत्रात २४ तास गस्त घालून संशयित हालचालींवर लक्ष ठेवतील यासाठी तात्काळ संयुक्त पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांनी दिलेत.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांच्या अध्यक्षतेखाली आज सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक दिव्या के.जे., जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील तसेच गोवा राज्यातील उत्पादन शुल्क विभाग, परीवहन विभाग, सागरी सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद म्हणाले, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यादृष्टीने सर्व पथकांनी सजग होवून काम करावे. महत्वाचे म्हणजे सागरी भागात अधिक गस्त घालून बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे.आंतरराज्य सीमा ओलांडून अंमली पदार्थ, दारू, शस्त्रे आणि वाटपाच्या वस्तु, रोख रक्कम आदि प्रतिबंधित वस्तूंच्या हालचालींना आळा घालण्यासाठी सर्व चेकपोस्ट, राज्य, आंतरराज्य चेकपोस्ट वर वाहनांची कडक तपासणी करावी. पोलीस विभागाने तसेच भरारी पथकांनी गस्त वाढवावी, संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.