गृह मतदानाला सुरुवात
लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान केले, सर्वांनी मतदान करावे
झाराप येथील शंकुतला सामंत यांचे मतदारांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मी ८६ वर्षांची महिला असून मतदानाच्या दिवशी मला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी खूप अडचण येत होती. भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे आता आमच्यासारख्या वयस्क व्यक्ती घर बसल्या मतदान करु शकतात. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कुडाळ विधानसभा मतदार संघातील ८६ वर्षीय मतदार शकुंतला सिताराम सामंत यांनी. झाराप येथील शकुंतला सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन गृह मतदान पथकाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तसेच दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मतदानाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६९-कुडाळ विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे,सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसलिदार वीरसिंग वसावे, शितल जाधव यांनी १५ ते १७ नोव्हेंबर रोजी गृह मतदानाचे नियोजन केले आहे. या उपक्रमातंर्गत आज झाराप येथे गृह मतदानावेळी मतदार शकुंतला सामंत बोलत होत्या.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात दि.१५ ते १७ नोव्हेंबर, २०२४ रोजी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार तसेच दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी गृहभेटीद्वारे मतदान करण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले होते. झाराप येथील दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदान करण्यासाठी फार्म १२ ड भरुन सादर केला होता. त्याकरीता आज गृहभेटीद्वारे मतदानासाठी पथकांची नेमणूक केली होती.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप येथे 85 वर्षावरील ज्येष्ठ मतदार शकुंतला सामंत वय ८६, यांनी तसेच दिव्यांग मतदार सहदेव गोविंद बिडिये यांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मतदान पथकात सूक्ष्म निरीक्षक प्रकाश पाताडे, मतदान अधिकारी विकास कुंभार, शैलेश मुळीक, पोलीस श्रीमती फर्नांडिस उपस्थित होत्या.