*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*पुष्प पहिले*
द शो मस्ट गो ऑन
काही वर्षांपूर्वी मेरा नाम जोकर हा सुप्रसिद्ध अभिनेते कै.राज कपूर यांचा चित्रपट खूप गाजला होता. त्यात राज कपूरने विदूषकाची भूमिका केली होती. जीवनात कितीही वेडी वाकडी वळणे आली, अनंत अडचणींना सामोरे जावे लागले तरी डगमगायचे नाही तर आपण सर्कशीतील विदूषकाप्रमाणे हसायचे
आणि लोकांना हसवत राहायचे, कारण हा जो शो सुरु झाला आहे तो सतत पुढे चालू राहिलाच पाहिजे असे फार मोठे प्रबोधन या चित्रपटातून राज कपूर साहेबांनी समाजाला करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी या प्रबोधनाचा मला कितपत बोध मिळाला होता हे सांगता येणार नाही, पण आज आयुष्याच्या उतारवयात *द शो मस्ट गो ऑन* हे वाक्य मनावर चांगलेच कोरले गेले आहे.
आज अनेक उन्हाळे, पावसाळे, हिंवाळे पाहिले. सकाळच्या कोवळ्या उन्हात प्रसन्न वाटले तर मध्यान्हीला कितीतरी चटके बसले. पावसात सृजनाला बहरही आला आणि कित्येक वेळा जलौघात अनेक चांगल्या गोष्टी वाहून गेल्या. थंडीत कुडकुडायलाही झाले आणि कोणीतरी अंगावर शाल घातल्यावर प्रेमाची ऊबही मिळाली. एकूण काय? ऋतुचक्र फिरते आहे आणि त्या चक्रासोबत माणूसही फिरतच आहे. थांबून चालते का कुठे?
माणसाचे आयुष्य हे खरोखरीच एखादी मनोरंजक सर्कसच आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या सर्कशीचे खेळ चालू असतात. खेळता खेळताच खऱ्या आयुष्याची ओळख होते आणि मदर टेरेसाने जीवनाविषयी जे म्हटले आहे,
ते मनाला तंतोतंत पटते.
त्या म्हणतात….
*Life is an opportunity, benifit from it*
जीवन ही एक संधी आहे, तिचा पूर्ण लाभ घ्या.
*Life is a beauty, admire it*
जीवन अतिशय सुरेख आहे, त्याच्या सौंदर्याची दखल घ्या.
*Life is a bliss, taste it*
जीवन फार खुमासदार आहे, त्याची चव घ्या.
*Life is a dream, realize it*
आयुष्य हे एक स्वप्न आहे, ते ओळखा
*Life is a challenge, meet it*
जीवन हे एक आव्हान आहे,ते आनंदाने स्वीकारा.
*Life is very costly,care for it*
माणसाचा जन्म हा अमूल्य आहे, त्याची नीट काळजी घ्या.
*Life is a wealth, keep it*
आपले आयुष्य ही संपत्ती आहे,ती व्यवस्थित सांभाळा.
* Life is a mystry,know it*
जीवन अत्यंत गूढ आहे, ते समजून घ्या.
*Life is struggle,accept it*
जीवन ही जगण्याची धडपड आहे, हे मान्य करा.
*Life is a game, play it.*
आयुष्य हा एक खेळ आहे,तो प्रत्येकाला खेळता आलाच पाहिजे, आणि जिंकेपर्यंत खेळतच राहिले पाहिजे.डाव अर्ध्यावर सोडून जाता येत नाही. एकाने डाव अर्धा सोडला तर दुसऱ्याला तो पुढे न्यावाच लागतो.
*द शो मस्ट गो ऑन*.
सुप्रसिद्ध रंगमंच अभिनेते बालगंधर्व यांच्याविषयी असे सांगितले जाते की, मानापमान नाटकाचा प्रयोग जाहीर झाला होता आणि नेमके प्रयोगाच्या दिवशीच त्यांच्या मुलीचे प्राणोत्क्रमण झाले. नाटकाचा प्रयोग आधीपासून लागलेला, तिकीट विक्री झालेली, अशा परिस्थितीत प्रयोग रद्द करणे, बाल गंधर्वांना रास्त वाटले नाही. ते प्रयोगाला गेले, नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची भामिनी ही भूमिका संपूर्ण न्याय देऊन सादर केली, नेहमीप्रमाणे वन्स मोर घेतले आणि नाटकाचा प्रयोग संपल्यानंतरच त्यांनी आपल्या मुलीचे
अंतिम क्रियाकर्म केले.
*Life is a duty, complete it*
जीवन हे कर्तव्य आहे, ते पार पाडा. असेही मदर टेरेसाने सांगून ठेवले आहे.
एक राजा जातो,दुसरा सिंहासनावर बसतो, ही जगरहाटीच आहे.जीवनपटावरील खेळ कायम चालूच आहे….
(क्रमशः)
*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन.*