युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिध्देश परब यांनी बांधले शिवबंधन…
दीपक केसरकरांच्या उपस्थितीत प्रवेश; शिरोडा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश…
सावंतवाडी
वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती आणि युवा कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिध्देश परब यांच्यासह शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य अनिषा गोडकर व पांडुरंग नाईक आदींनी आज शिवबंधन बांधले. मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तब्बल शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या समवेत पक्षात प्रवेश केला. दरम्यान विकासाच्या मुद्यावर आणि मंत्री केसरकर यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. येणार्या निवडणूकी त्यांना रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांना मोठे मताधिक्य देवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोंसले, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, शिवसेना नेते बाळा गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, परिक्षित मांजरेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले,कॉंग्रसच्या संघटनेत आम्ही काम केलं. आमच्या पक्षाचा उमेदवार असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, उबाठा शिवसेना सोबत आल्यानंतर आमच्यावर अन्याय झाला. कोकणात एकही उमेदवार कॉंग्रेस पक्षाला दिला नाही. सावंतवाडीत उमेदवार असताना देखील राजन तेलींना प्रवेश देऊन महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने आम्ही नाराज होतो. म्हणून, आज केसरकर यांच्या उपस्थितीत आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.