You are currently viewing प्रेम कवितेचे

प्रेम कवितेचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम कवितेचे* 

 

वळणावरच्या वाटेवरून

जाता जाता

भेटली होती मला

एक कविता

 

सौंदर्याने नटली होती

हसली होती फसली होती

पुढ्यात येऊन बसली होती

थोडे हटकले तर

रुसली होती

 

विचारले तिला

कुणाची कोण गं तू

इथे का आलीस

का असे पुढ्यात येऊन बसली

चल हो बाजूला

खूप काही कामे आहेत

जाऊ दे पुढे मला

 

मग ती म्हणाली,

तुझ्या शिवाय आता

ह्या वळणाच्या वाटेवर

माझे इथे कोण आहे

 

तुझ्याच मनाच्या एका कोपऱ्यात

घर होते माझे

तेंव्हा तू माझ्यावर

खूप प्रेम करायचा

माझ्यातच गुंतून रमायचा

माझे सौंदर्य बघायचा

मला जगासमोर मांडायचा

खूप आनंदी असायचा तू

 

मग काळ असा का बदलला

तू मला दूर केले

खूप फिरले मी

तुला शोधत राहिले

तुझ्या अवतीभवतीच होते

आज तू ह्या वळणाच्या वाटेवर

असा एकांतात दिसला

म्हणून

तुझ्या पुढ्यात येऊन बसले

तुला विनवायला

मनवायला आले

कर माझा पुन्हा स्विकार

घे मला तुझ्या

मनाच्या कोपऱ्यात

प्रेमाने कवेत घे हवे तर

आणि

माझे सौंदर्य जगाला दाखवत रहा

आता मला तुझ्या शिवाय

या जगात कोणीच नाही

मी तुझी कविता

अन्

तूच माझा

कवी आहेस…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा