छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :
दिनांक 10 नोव्हेंबर रोजी साहित्य क्षेत्रातील साहित्यतेज साप्ताहिकाच्या संपादिका कवयित्री सुप्रिया जाधव यांनी संपादित केलेल्या साहित्यतेज दीपावली विशेषांकाचा प्रकाशन सोहळा तसेच निमंत्रित कविंचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.माधुरीताई चौधरी (सुप्रसिद्ध साहित्यिका, छत्रपती संभाजीनगर ) यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाहीर कवी श्री.उत्तमराव म्हस्के, मा.प्रकाश पाठक (कवी,लेखक,चित्रकार) आणि कवी, लेखक श्री.विजयकुमार पांचाळ (महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) हे होते. हा प्रकाशन सोहळा तसेच कविसंमेलनाचा कार्यक्रम सिडको रोड, महाराणा प्रताप उद्यान (कॅनॉट गार्डन ) छत्रपती संभाजीनगर येथे निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आला होता.
कवयित्री सौ.सुनिताताई कपाळे यांच्या मधुर आवाजात सादर झालेल्या स्वागतगीताने या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली.मान्यवरांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ‘साहित्यतेज दीपावली विशेषांकाचे’ प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनाला सुरुवात झाली. लेक,आई, बाप, आजोबा, बहीण, सैनिक, कविता काय असते?, प्रेम, व्हिडिओ कॉल अशा विविध आध्यात्मिक, सामाजिक विषयावर बहारदार काव्यरचना सादर केल्या.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मा.माधुरीताई चौधरी यांनी नवोदित साहित्यिकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कविता लिखाणासोबतच इतर साहित्यिकांच्या कविता आपण ऐकल्या पाहिजे, तसेच कवितेचा दर्जा वाढविण्यासाठी व प्रभावी सादरीकरण करण्यासाठी एक साहित्यिक म्हणून वाचन केले पाहिजे, एक चांगला श्रोता होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले आणि मराठी, हिंदी भाषेत प्रभावी रचना सादर केल्या.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शाहीर श्री उत्तमराव म्हस्के यांनी बहीण ही हृदयस्पर्शी रचना सादर केली. त्यांनतर साहित्यिक प्रकाश पाठक यांनी प्रेरणादायी रचना सादर केली. तसेच कवि श्री.विजयकुमार पांचाळ यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिकांचा पुढील प्रवास उज्ज्वल असल्याचे सांगत वंशाचा दिवा या विषयाची सामाजिक, भावस्पर्शी रचना सादर करत रसिकांची मने जिंकली. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोदी स्वरूपात कवी प्रा.डॉ. सुशिल सातपुते यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनाचे विशेष कौतुक अध्यक्षा माधुरीताई चौधरी यांनी भरभरून केले. कविसंमेलनात उपस्थित असलेल्या सर्वच कविंच्या कविता अतिशय प्रभावी झाल्या. निमंत्रित कवि कवयित्री सौ.सुनिताताई कपाळे, श्री.सुरेश खरात, श्री.संभाजी गायकवाड, श्री.आर.पी.शिखरे, श्री.दिपक नागरे, श्री.राहुल इंगोले, श्री.ज्ञानेश्वर काळे, सौ.मंगल वाघमारे, श्री.विवेक जोशी, श्री.योगेश कोंडके, श्री.सागर कोलते, श्री.शरद म्हकांळे, श्री.उल्हास देशपांडे, सौ.धम्मप्रीया खरात, श्री.अर्जुन गायकवाड, श्री.गोविंद कांबळे यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. सर्व कवी कवयित्री यांना पुष्पगुछ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याचे आयोजन संपादिका, कवयित्री सुप्रियाताई जाधव यांनी केले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही साहित्याप्रती असलेले प्रेम जपण्यासाठी सुप्रियाताई जाधव यांनी साहित्यतेज हा दीपावली अंक प्रकाशित केला आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या साहित्यिकांचे साहित्य व नवोदित कविचे साहित्य एकाच ठिकाणी आपल्याला वाचायला मिळेल. हेच या अंकाचे विशेष आहे. सर्व स्तरातून या प्रकाशन सोहळ्याचे तसेच कविसंमेलनाचे कौतुक होताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे आभार संपादिका कवयित्री सुप्रियाताई जाधव यांनी व्यक्त केले.