शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
कणकवली :
५० खोके कोणी दिले, याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केलाय. पहाटेच्या शपथविधीला अदानी होते असे सांगितल्यामुळे आता सर्व लक्षात येतंय. आता कोकण अदानींच्या घशात घालण्याचा या मिंधे सरकारचा डाव आहे. असे झाले तर दाद कोणाकडे मागणार? त्यामुळे वेळीच हा धोका ओळखा आणि यांना सत्तेपासून दूर ठेवा यासाठी कोकणातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
कणकवली येथील संदेश पारकर यांच्या आयोजित प्रचारसभेत श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उमेदवार संदेश पारकर, माजी खासदार विनायक राऊत, कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, आमदार मिलिंद नार्वेकर, उबाठा शिवसेना उपनेते शरद कोळी, गौरीशंकर खोत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रवक्ते स्वप्नील धुरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, सौ. समुद्धी पारकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, अंकुश कदम आदी उपस्थित होते.
मी विकासाला स्थगिती दिल्याची टीका करतात पण मी विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती. यापुढे तर बंदीच घालीन. कोकणच्या विकासासाठी ५० हजार कोटींची मागणी संदेश पारकर यांनी केली. होय आम्ही ती देऊच. पण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला तेथे पाहणीसाठी जाणाऱ्यांना अडविण्यात आले. आपले पाप उघडे पडेल म्हणून अडविता? म्हणुनच मी माझ्या भाषणात महाराष्ट्रप्रेमी असा उल्लेख करतो कारण ही लढाई महाराष्ट्र प्रेमी व महाराष्ट्र शेठी यांच्यात आहे. दादागिरी, धमकीचे दिवस तुम्हाला येथे पुन्हा हवे आहेत का? भविष्यात यांना कोकण अदानीच्या घशात घालायचे आहे. मी नाणारची रिफायनरी रद्द केली, बारसुही होऊ देणार नाही. इथल्या लोकांच्या विरोधात काहीही होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली कोकणला त्रास न देता पर्यावरण रक्षण करून रोजगार मिळेल असा विकास आपण करू असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.