*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
हळद लागली….
हळद लागली अंगाला बाई लाजून झाले चूर
घोड्यावरती येईल स्वारी मना लागे हुरहुर..
सनई वाजे दारी हृदयी गोड गुदगुल्या होती
हजारात मी अशी देखणी शोभेल मजला मोती…
पायी मासोळ्या बिंदी ती छान
नथ नाकात वाढवी शान
मेंदी रंगली चुटूक लाल
आठवणीने रंगले गाल
फेट्यामधला साजण माझा हात घेईल हाती..
सनई वाजे दारी हृदयी गोड गुदगुल्या होती…
त्याच्या शेल्याला बांधून पदर
अग्नी भोवती धरेल फेर
नातं यगायुगाचं हो माझं
माझ्या मनावर करतोय राज
प्रेमळ माझे आई बाबा जळती दिवा नि वाती
सनई वाजे दारी हृदयी गोड गुदगुल्या होती….
लक्षुमीच्या पावली मी जाईन
माप ओलांडून राणी मी होईन
नाती जपून दोन्ही कुळांची
शान वाढवेल दोन्ही घरांची
वंशवेल हे जाईल गगनी राहीन सदा जागती
सनई वाजे दारी हृदयी गोड गुदगुल्या होती…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)