You are currently viewing डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली थायलंडमध्ये पाचवे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली थायलंडमध्ये पाचवे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

पुणे :

 

स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी तसेच स्नेहल टूर्स अँड ट्रॅव्हल डोंबिवली तर्फे २१ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत थायलंड येथे साहित्यिक सहलीचे व येथील पटाया शहरात पाचवे अक्षरविश्व मराठी साहित्य संमेलन आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर(पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.सुधाकर आगरकर या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहित्य संमेलनाबरोबरच गझलगायन हा विशेष कार्यक्रम विशेष अतिथी असलेले प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीतकार प्रा.श्याम क्षीरसागर तसेच ज्येष्ठ गझल गायक श्री.सुरेश दंडे यांनी सादर केला . ग्रंथ दिंडी, परिसंवाद,कवी व गझलकट्टा ,सांस्कृतिक कार्यक्रम व तज्ञांचे मार्गदर्शन असे संमेलनाचे स्वरूप होते . संस्थेच्या अध्यक्षा आणि संयोजिका सौ.कल्पना गवरे मॅडम यांनी संमेलनाच्या आयोजन आणि नियोजन व संस्थेचे कार्य आणि उद्दिष्टे याबद्दल सविस्तर प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक श्री. एम्.के.गोंधळी सर (पुणे) यांचे खास कथाकथन लक्षवेधी ठरले संमेलनाच्या सूत्रसंचालनाची धुरा गझलकार श्री.किरण वेताळ यांनी आपल्या खास शैलीत सांभाळली .संमेलनाच्या यशस्वी नियोजनासाठी ज्येष्ठ गझलकार श्री .रवींद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने कार्य पाहिले. कवीसंमेलनात नीता सांगोलेकर, स्मिता शिपुरकर,अनिता ताबे,डॉ.हनुमंत जाधवर ,डॉ. अहिवळे, किरण वेताळ,रवींद्र सोनवणे, सौ.कल्पना गवरे ,श्री.उत्तम जोशी यांचे कविता आणि गझल सादरीकरण झाले. तसेच कु युगा डांगे या बाल कथक नृत्यकारिकेचे उत्कृष्ट नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळाली .प्रमुख अतिथी वैज्ञानिक डॉ.सुधाकर आगरकर सरांनी विज्ञान कथा आणि त्यांच्या आजवरच्या संशोधनातील बोधपर अनुभव आपल्या भाषणातून सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणात डॉ.अविनाश सांगोलेकर सरांनी मराठी भाषेची अस्मिता जपताना तसेच मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा यावर आपले विचार मांडले.स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली संस्था सातासमुद्रापार जाऊन मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसार करीत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. ‘ संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे ‘ अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्या नंतर संमेलनाच्या शेवटी सर्व सहभागी साहित्यिकांना व कलाकारांना संमेलनाध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी तर्फे सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. आपल्या मराठी भाषेला नुकत्याच मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याचा डंका साता समुद्रापार वाजविण्याचा बहुमान या संमेलनाच्या निमित्ताने स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यांना मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा