You are currently viewing महाविकास आघाडीची सत्ता येताच पुनर्विकासाला प्रथम प्राधान्य – सचिन अहिर 

महाविकास आघाडीची सत्ता येताच पुनर्विकासाला प्रथम प्राधान्य – सचिन अहिर 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्प्रिंग मिल इमारत पुनर्बाधणी, टाटा मिल किंवा कोहिनूर मिल चाळींच्या पुनर्विकासा बरोबरच मुंबईतील खासगी तसेच सरकारी गिरण्यांच्या जमिनीवर असलेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न, महाविकास आघाडीचे‌ सरकार सत्तास्थानी येताच प्राधान्याने सोडविण्यासाठी भूमिका घेईल, अशी ग्वाही शिवसेना उपनेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी गिरण्यांच्या चाळींच्या भेटी प्रसंगी दिली. वरील चाळींच्या रहिवाशांनी सचिनभाऊ अहिर यांच्याकडे भेटीसाठी आग्रह धरला होता. आजच्या भेटीप्रसंगी रा‌ष्ट्रीय मि‌ल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विभागिय (ठाकरे) शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला पांचाळ, पवन श्रीधर जाधव, माजी नगरसेवक अरुण नरे, सुनिल अहिर आणि संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार नेते, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी आज परळ येथील टाटा मिल चाळ कंपाऊंड, नायगाव येथील स्प्रिंग मिल चाळ आणि नायगाव मधीलच कोहिनूर मिलच्या चाळींना भेटी दिल्या आणि रहिवाशी तसेच संबंधित कमिटीच्या पदाधिकार्‍यांशी सद्यपरिस्थिती विषयी चर्चा केली.

स्प्रिंग मिलच्या लांबत चाललेल्या घरांच्या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे सांगून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, स्प्रिंग मिलच्या पुनर्वसनाचा प्रश्न अकारण लांबविण्यात आला आहे. या प्रश्नाची त्वरित सोडवणूक झाली पाहिजे, असे स्प्रिंग मिल भाडेकरू संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडतांना सांगितले.

एनटीसी मालकीच्या नायगाव येथे मोडकळीस आलेल्या‌ कोहिनूर चाळींमधील ९०० ते १००० कुटूंबाच्या भवितव्याचा प्रश्न आज अधांतरीत असून, या प्रश्नावर राज्य सरकारने अकारण वेळेचा अपव्यय केला आहे, असे भाडेकरुंनी सांगितले. मुंबईतील सर्वच खाजगी तसेच एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न म्हाडा योजने अंतर्गत सोडविता येऊ शकतो. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही सचिनभाऊ अहिर यांनी भाडेकरूंना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा