मालवणात पथनाट्याव्दारे मतदार जनजागृती
सिंधुदुर्ग
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने घराबाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने मालवण शहरात पथनाट्य, स्वाक्षरी मोहीम, मतदार सेल्फी पॉईंट इत्यादी माध्यमातून मतदार जनजागृती सुरू आहे.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या पुढाकारातून मालवण नगर परीषद आणि अष्टपैलु युवा निकेतन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मालवण एस.टी.स्टॅण्ड, भरड नाका व फोवकांडा परिसरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट करावी, नागरिकांनी निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. या पथनाट्याला मालवण शहरातील नागरीक, मालवण नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्ती प्रतिसाद दिला.