*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*’आठवते ती दिवाळी’*
नुकतीच सहामाही परिक्षा संपायची आणि दिवाळीची सुट्टी लागायची.परिक्षा संपल्याचा आनंद येणार्या दिवाळीमुळे द्विगुणित होत असे.
पाऊस परतीच्या वाटेवर लांबवर पोचलेला, नविन धान्याच्या ऊलाढालीने बळीराजा सुखावलेला,होऊन गेलेल्या पावसामुळे झाडे ,डोंगर माळराने हिरवीगार, तजेलदार, विपुव चार्यामुळे गाई गुर आनंदात, शरदाचं पडू लागलेलं चांदणं, झुंजूमुंजू काळोखी पहाट, सुरू झालेली थंडी, पहाटे धूक्याची पसरलेली चादर व नंतर झुलणारे ,चमकणारे दंवबिंदु,बहरलेल्या फुलवेली हे सगळंच वातावरण मन ऊल्हसित करत असे.एक वेगळाच जोश चैतन्य मनात भरत असे.त्यात सुट्टी ….. मग काय मोकळ्या मैदानात, माळरानात अनेक आमच्यासारखी ऊनाड टोळकी असतव त्यांच्या खास जागा “अड्डा’म्हणुन असत.
इथे काय ती मस्ती, दादागिरी, भांडणे इ…इ..पण घरी मात्र अगदी शिस्तीत .धाकात राहात असु.
अड्ड्यावर असे गुंडागर्दीत चार दिवस जायचे तोच घरुन आई, ताई, आजी यांच्या हाका चालू होत.
आम्हा मुलांना जमेल ती साफसफाई, चक्कीवरून दळणं दळुन आणणे, बाहेऊन काही आणुन देणे इ.कामे सांगितली जायची.
अशी आमच्या दिवाळीची सुरवात होत असे.
दिवाळीचा जोश ऊत्साह इतका असे कि भराभर ही कामे ऊरकुन आम्ही परत अड्ड्यावर पसार.
दोन चार दिवस गेले कि ऊनाडक्या संपुन दिवाळीवरच्या चर्चा आखणी, चालू होत.
मुलगे वेगळे होत व किल्ले, आकाशकंदील, फटाके, नविन कपडे यावरच बोलत…. तर मुली मेंदी, नेलपॉलिश, डुल बांगड्या,माळा,नवे कपडे गेरुचे सारवण, रांगोळ्या, रंग,अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी करत असत . बोलण्यात आवेश जोश इतका असे कि बघतच रहावं.
आपोआप काय मिळेल व कोणत्या हव्या त्या गोष्टींचा हट्ट करावा लागेल हे इथेच व आत्ताच ठरत असे.
हळूहळू घरी घर स्वच्छ होऊन पितळी डबे चकचकित घासुन ऊन्हात पडत, वाणी यादीनुसार सामान पोचवत .
नविन कपडे शिवायला जात, खरेदी आई बरोबर जाऊन ऊरकत असे.
आई व आजी सुकी तयारी करायला लागत तर मुली अंगण झाडून सुरक्षित कोपरा गेरूने रोज सारवत रांगोळीची तयारी करत.
काही मोठी मुलं रंगीत कागद आणुन तो छान अष्टकोनी किंवा पायलीचा आकाशकंदिल करायला घेत.काही मुलं दगड माती गोळा करत किल्ला्याची जागा,व सुरवात करत.एकेक जण आपल्या घरून सजावटीच्या वस्तु आणुन किल्ला जिवंत करायच्या तयारीत असत.
बुरूज, मावळे, धान्य पेरून जंगलं शेत गाय बैल विहिर झेंडे घोडेस्वार सगळ्यांना जागोजागी बसवत सुंदर, दिमाखदार किल्ला तयार होई.जागोजागी किल्ले सुंदर तयार होत.
फटाके सोयीनुसार घरी आणत. ते सुपात ठेऊन वाळवणे व नंतर भावंडांप्रमाणे त्यांची वाटणी होणे हे तर आवडीचेच काम.त्यातही पळवापळवी , दादागिरी असायचीच पण भांडणे नसत.
अशी ही ऊल्हसित , चैतन्य घेऊन आलेली दिवाळी जणु काय प्रत्येकाच्या तनामनातच शिरत असे.
आळस, कंटाळा, थकवा ही स्टेशने आमच्या ऊत्साहाच्या गाडीच्या वाटेत येतच नसत.
आता घराघरातुन खमंग वास यायला लागत. व दिवाळी अंगणात हंसत नाचत ऊभी राहायची.मुलींच्यात रांगोळ्या रंग,यांची तर मुलांच्यात किल्ले आकाशकंदिल यांत मोठीच चुरस, चढाओढ लागे.
घरात दारावर दिव्यांची तोरणे झगमगु लागत, रांगोळ्या अधिकच मोठ्या व गडद होत.
आकाशकंदील मोठ्या दिमाखात ऊजळत.एखादा चुकार फटाका वाजत असे.
सकाळी मुली कुंपणावरची मेंदीची झाडे शोधुन पाने ओरबाडुन आणत.
त्यात काही बाही घालून बारीक वाटत व हाता पायाला फासत.रंगलेली बघुन ऊत्साह खुप वाढत असे.आता वेळ नेलपॉलिशची असे.ते नखांवर लावायचा जो काही आनंद असे तो आज वर्णन करताच येणार. नाही.
ही दिवाळीची शेवटची तयारी होत असली तरी अड्ड्यावर जायचं, खिशातला खाऊ मिळुन खायचा कुठे पळवापळवी चालुच असे .कारण घरची शिस्त व वळण तशी अड्ड्यावरती सुद्धा शिस्त असायची.
सतत जोशभरा आवेश घरी व दारी सुद्धा असायचा
घरी आया आता रोज एक फराळाचा स्वादिष्ट घरगुती ताजा देखणा पदार्थ डबाबंद करायच्या.
पदार्थ तरी किती?
अनारसे, कडबोळी, दोन तीन प्रकारचे लाडू,शेव, चकल्या चिवडा,चिरोटे शंकरपाळी,व सर्वात शेवटी करंज्या असे घरी बनवत. आधी दोन आठवडे त्यांची तयारीत आई, आजी, काकू बुडलेल्या असत.
पदार्थ अगदी सहज घरोघरी बनत व तेही मुबलक प्रमाणात असत.
दिवाळीची सुरवात वसुबारशाने होत असे.पणत्या तयार होऊन अंगण ,परसदार, देवघर, ऊंबरठा ऊजळुन टाकत.आज करंज्या व्हायलाच हव्यात.
घरोघरी बायका मुली गोठ्यात जाऊन… आपल्यसाठी शेतात राबणार्या बैलांना, दुध देणार्या गाई वासरांना पहिला करंजीचा गोड घास देत व नंतर थोडा फराळ त्या शेतकर्याला देऊन कृतज्ञता व्यक्त करत.
अशी आता खरोखरीची दिवाळी घरोघरी हंसत नाचत आनंद , नवी ऊमेद घेऊन शिरत असे.
तिचे जय्यत तयारीनिशी आनंदात ऊत्साहात स्वागत होत असे.
प्रत्येक घर आनंद व ऊत्साहाने भरून जाई.
धनत्रयोदशी तशी शांतच असे. आजी पुजेत धनेगुळ ठेवत असे.
मग ऊजाडत असे नरकचतुर्दशी.
मोठी माणसे पहाटे कधीच ऊठून तयारी करत. बंब मस्त पेटवलेला असे
बाहेर तेवत्या पणत्या, विराजमान झालेला देखणा कंदिल,दाराजवळची सुंदर रंगीत रांगोळी, सुखद असा गारठा,फुललेल्या फुलवेलींचे सुवास, तर घरात पाटरांगोळी, घरी बनवलेल्या त्या अविस्मरणीय ऊटणे व तेल चोळुन ती पहाटेची गारठ्यातली गरम पाण्याची सचैल अंघोळ फारच आल्हादायक असे.आजही ती अंघोळ विसरता येत नाही व आई, आजी आठवल्याशिवाय राहात नाही.
नवे कपडे कपाळी कुंकुम तिलक, बाहेरची सजावट,रोषणाई, नट्टापट्टा केलेल्या मैत्रिणी,त्यांचे डुल माळा कपडे बांगड्या याचे नखरे.
घरात काय किंवा बाहेर काय सगळे वातावरणच एका वेगळ्याच जोशाने भारलेले असे.व दिवाळीचा सण अगदी भारी आहे हे जाणवायचं.यामुळे ऊत्साह व आनंद वाढतच अस
मग देवळात घोळके जात. नाविन्याची चुरस लागे.देवाला घरुन दिलेला फराळ ठेऊन घरी परतायचं असे.
एखाद्या दु:खी घरात आठवणीने व आवर्जुन फराळ व मुलांना फटाके पोचवले जात.
आता आवडता क्षण येऊन ठेपायचा.
रांगोळी ने सजलेल्या ठिकाणी एकत्र फराळाला बसायचं.आई,आजी काकू खुप आग्रह करत.
खुप दिवसांनी असे स्वादिष्ट दिमाखदार पदार्थ, खायला तेही घरगुती ताजे मिळत सगळ्यांनी हंसत गप्पा मारत आई आजी इ्
चे कौतुक करत तो केला जाणारा फरळाचा सोहळा डोळ्यापुढून हलत नाही.त्याचं नाविन्य विसरता येत नाही.
फराळाने सुस्ती यायची पण रोजचा अड्डा चुकवण्याचा कंटाळा कधीच येत नसे.
नंतर लक्ष्मीपुजन हळदीकुंकू म्हणजे आम्हा मुलींची पर्वणीच असे.सारखा नट्टपट्टा करायची हौस काही विचारू नका.नुसतं मिरवत रहायचं.
पाडव्याला आसपास कोण्या … कुंदा, मंदा, पुष्पाचे लग्न होऊन आज दिवाळसण असे.
आम्हा मुलींना ती नटुन येणारी “ती” व तिचा कोटटोपी घालुन खाली चपलाघातलेला बुजरा “तो “जाव ई बघण्याचा किती आनंद असे.
घरगुती पक्वान्नाची पंगत , तिने घेतलेला ऊखाणा, तिची सासु हे सगळे अड्ड्यावरचे चेष्टेचे विषय खुप दिवस पुरत असत.घरी सुद्धा आई बाबांना ओवाळत असे. मग आई आजीला नविन साडी …. तर कधी एखादा दागिना मिळायचा त्याचं फार घरात अप्रुप वाटे. घरातील स्त्रिया सुद्धा भरजरी साड्या,ठेवणीतले दागिने अंबाडे,गजरे नथ घालुन देवळात, हळदीकुंकवाला जात, पाडव्याची ओवाळणी करत तेव्हा अशा खानदानी दिसत .त्यांच्या चेहेर्यावरचे तेज नुसते ओसंडुन वहात असे.
सगळे फराळ करताना, लक्मीपुजन करतानचे बाबा बघताना, आईला पाडव्याची ओवाळणी करताना पहाताना आजीचा चेहेरा सुख समाधानाने आनंदात असा ऊजळुन यायचा कि जणू ती एवढ्यासाठीच जगते आहे.
भाऊबीज खुप वाजत गाजत येई.
वारंवार न भेटणारे भाऊ बहिणी अगदी ऊत्साहाने ही साजरी करत.
घरोघरी कोट टोपी घालुन, फराळाचा डबा घेऊन भाऊराया अआपुलकीने, ओढीने येत. बहीणी अगत्याने स्वागत करत.
चारी ठाव सुग्रास जेवणावर खुष होत .
आई,आजी काकू व आमचेही सख्खे चुलत आते मामे मावस असे सगळे भाऊ दिवसभर येत रहात.फराळाचे डबे, भेटल्याचा खरा आनंद, व औक्षण ओवाळणी हा सगळा आनंद,जाताना परत भरलेला फराळाचा डबा व भरलेले डोळे यांनी भाऊबीज संपायची.
आता दिवाळी परत आपल्याघरी निघत असे.
सगळा आवेश, जोश, ऊत्साह गळुन पडे.
पण मग घरोघरी मित्रमैत्रीणींचे घोळके फराळाला जमत. व आनंदी होत.
शेवटचे चार दिवस रात्रंदिवस घरचा गृहपाठ पूर्ण करण्यात हात दुखुन येत पण कंटाळा नाही म्हणजे नाहीच.
शाळा पण सुरु होई व दिवाळीचा अंमल नाहीसा होई.
अशी ही माझ्या बालपणीची “ऊत्साहाने ,चैतन्याने मुसमुसलेली, जोशभरी ,हंसत नाचत येणारी दिवाळी आज हरवली असं वाटतं
आनंदाचा प्रकाश ऊजळत, आपुलकी जिव्हाळा ,आग्रह, देवाण घेवाण यांनी भारलेली दिवाळी मला सापडत नाही.
कुठे गेल्या त्या अनंत कष्टानंतरही चेहेर्यावर थकवा न दाखवणार्या आया,आज्या,?
ताज्या स्वादिष्ट फराळांचे चकचकित पितळी डबे कुठे गेले?
ते देखणे स्वत:बनवलेले कंदिल, ते कील्ले त्या रांगोळ्या त्यातली चुरस चढाओढ,कुठे आहे?
घरचे ऊटणे, पाटरांगोळ्या, तेवत्या पणत्या,त्या सुखद अंघोळी, ती मंतरलेली पहाट,ते ओढीने येणारे भाऊ व वाट पहाणार्या बहिणी,एकमेकांकडे आवर्जुन फराळाला जाणारे घोळके,आम्हा मुलींचा नट्टपट्टा नखरा कुठे हे सगळे हरवले.
सगळा जोश ऊत्साह ऊमेद चैतन्य आज अपवाद सोडले तर कुठे सापडत नाहीत.
खरं सांगू का?
बाहेरची दिवाळी सेलीब्रेशन्स, दिवाळी पहाट सुरु झाले आणि आमच्यावेळची “घरगुती दिवाळीचा दिमाखदार सोहळा ‘
हरवलाच.
ती दिवाळी मनामधे एखाद्या “गडद रंगातल्या देखण्या रांगोळी “सारखी रूतुन बसलेली आहे.
शहरात तर नाहीच पण सापडलीच तर ती शहरापासुन दूर अशा खेडेगावात सापडेल सुद्धा
पण शहरात आता, महागाई, विकतचे फराळ, ना स्वाद ना नाविन्य,
मुलांना टिव्ही मोबाईल यामुळे बाकी ऊत्साह नसतोच. कमी भावंडे चौकोनी त्रिकोणी कुटूंबे त्यामुळे येणेजाणे कमीच झाले,ना अगत्य ना जिव्हाळा.
ब्लॉक मधे घरबंद दिवाळी, विकतचे कंदील धोकादायक फटाके, या सगळ्यात कृत्रिम भावनेतुन, ओढुनणताणुन, इर्षा स्वार्थ भावनाशुन्य चुरस, वेळच नसतो ही सबब, घरापेक्षा बाहेरची ओढ या सगळ्यात दिवाळीचा सोहळा हरवला आहे.
अनुराधा जोशी,
विजयनगर अंधेरी पूर्व ६९