जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा जिल्हा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांची माहिती
मालवण :
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची मागणी असणारे केशशिल्पी महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाल्याने नाभिक समाजाकडून जिल्हयातील तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ यंत्रणा उभी करण्यात येणार आहे, अशी माहिती नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष रूपेश पिंगुळकर यांनी दिली. नाभिक समाजाच्या पाठिंब्याबाबत बोलताना श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, नाभिक समाजाच्या विकासाकासाठी केंद्र शासनाने राबविलेल्या विश्वकर्मा योजनेतून अनेक नवोदित कलाकारांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत होणार आहे. सध्या या योजनेतून अनेकांची ट्रेनिंग पूर्ण झालेली असून लवकरच त्यांचा व्यवसाय सुरू करण्याबाबत बँकांकडून कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना हाती घेवून अनेकांना हक्काचा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे गावातील युवक नोकरीच्या मागे न राहता स्वतःचा व्यवसाय स्वतःच्याच गावात सुरू करू शकणार आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या शासनाने नाभिक समाज आभार मानत आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
महायुतीच्या शासनाने विश्वकर्मा योजनेच्या प्रारंभासाठी सर्व समाज घटकातील जिल्हाध्यक्षांना सन्मानाने दिल्लीत बोलावून त्यांच्याकडून समाजाच्या अडीअडचणींची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून घेतली. सर्व घटकांना पंतप्रधानांच्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या लघु सुक्ष्म उद्योग मंत्रालयाच्यावतीने केंद्र शासनाच्या अनेक योजनांचीही माहिती यानिमित्ताने नाभिक समाजाला देण्यात आली होती. यामध्ये नाभिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक समाजाचा सन्मान यातून करण्यात आला होता. तसेच प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्यासाठी नाभिक समाजातील अनेक तरूणांना महायुतीच्या शासनाने आणि भाजपने संधी दिली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीत नाभिक समाज महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
नाभिक समाजाच्यावतीने महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांची भेट घेण्यात आल्यानंतर अनेक समस्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने समाजाच्या विकासासाठी महामंडळाची स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल महायुतीकडून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आणि महायुतीच्या शासनाने नाभिक समाजासाठी केशशिल्पी महामंडळ स्थापन करून त्यासाठी तब्बल ५० कोटी रूपयांचे बजेट निश्चीत केले आहे. यामुळे अनेक तरूणांना आपला रोजगार उभा करण्यासाठी संधी मिळणार आहे. सदरचे बजेट भविष्यात १५० कोटी रूपयांचे होण्यासाठी नाभिक समाज संघटना पाठपुरावा करणार आहे. मात्र सध्या महामंडळ निर्माण झाल्याने नाभिक समाजातील तरूण तरूणींना शासन स्तरावरून आवश्यक ते सहकार्य मिळणार आहे. तसेच कर्ज पुरवठा होण्यासाठी सबसिडीही मिळणार आहे. जेणेकरून कोणताही व्यावसायिक कर्ज उपलब्ध होत नाही, म्हणून मागे राहणार नाही, असाही विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. नाभिक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि समाजाचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी महायुतीच्या शासनाकडून राबविण्यात आलेल्या योजनाही सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
कणकवली-देवगड-वैभवावाडी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे, सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर आणि मालवण कुडाळ मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठिशी नाभिक समाज खंबीरपणे उभा राहणार आहेत. तिन्ही मतदार संघातील नाभिक समाज बांधवांपर्यंत संघटनेच्यावतीने पोहचून समाज बांधवांना महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले. लवकरच समाज भवन साकारणार आहे. महायुतीच्या काळात नाभिक समाज बांधवांच्या समाज भवानासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. आता पुन्हा महायुतीचे शासन राज्यात आल्यानंतर नाभिक समाज भवन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नाभिक संघटना प्रयत्नशिल राहणार आहे. नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी दिलेले आहे. तसेच समाजाच्या अनेक प्रसंगामध्ये श्री. राणे खंबीरपणे उभे राहिलेले असल्याचेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.