*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*माझे गाव कापडणे..*
आपल्या क्रांतिकारकांनाही गोळीबार करायचा
नव्हताच. ड्रायव्हर इंग्रज सरकारचा नोकर होता. त्यामुळे तो ही सरकारी चाकरी करत होता. साहेबाला घाबरून त्याने गाडी दामटवली. मग नाईलाजाने क्रांतिकारकांना
गोळीबार करून गाडी थांबवावी लागली. कारण त्यांचे ध्येय व्यापक होते, मोठे होते. ह्या
देशातून इंग्रज जायलाच हवे होते. त्यांना असकाराने जेरीस आणून, त्रास देऊन देश
सोडायला लावणे भाग होते. त्या साठी सामदामदंडभेद सारेच उपाय अंमलात आणणे
भाग होते. म्हणून गोळीबार करून गाडी थांबवली कारण खजिना लुटायचा होता. जो
आपलाच होता, आपलेच पैसे होते ते क्रांतिकार्यासाठी वापरले तर काय हरकत?
हो, ह्या क्रांतिकारकांना पैशांअभावी अनेक
अडचणींना सामोरे जावे लागे. म्हणून लुटला
तरी जो थोडाच वापरला होता त्याचा हिशोब
त्यांनी भारत सरकारला सादर केला होता.
बाकी सरकारला जमा केला होता.
तर, गोळी लागल्यामुळे ड्रायव्हर जखमी
झाला नि गाडी थांबली.
तर मंडळी,क्रांतिकारकांनी पहिल्या प्रथम काही केले असेल तर ते म्हणजे,त्यांनी जखमी ड्रायव्हर व पोलिस या दोघांना एका झाडाखाली निंबाच्या झाडाची पाने खाली अंथरून त्यावर दोघांना झोपवले.त्यांच्या जखमेवर पट्ट्या बांधल्या.आणि नंतर क्रांतिकारकांनी खजिना घेऊन जाणारा कारकून श्री. वाणी याच्या कडून खजिन्याच्या पेट्या उघडून घेतल्या. तो खजिना चार गाठोड्यात बांधला. चिल्लर वजनाला जड असते त्यामुळे ..“चिल्लर घ्यायच्या भानगडीत न पडता ती त्यांनी रस्त्यातच टाकून दिली.” कारण ती जड असते, वाहून नेणे सोपे नसते.
(मी माझ्या आईच्या तोंडूनही चिल्लर फेकून
दिल्याचे ऐकले आहे).आणि क्रांतिकारक लामकानी गावाकडे निघून गेले. (पायी बरं मंडळी, डोक्यावर गाठोडे, पोलीसांचा धाक) मधल्या काळात चिमठाणे येथे मागे
राहिलेले डॅा. उत्तमराव पाटील आणि त्यांचे एक
साथीदार हे ही या क्रांतिकारकांना येऊन मिळाले होते. डॅा. उत्तमराव १५ मिनिटे उशिरा पोहोचले व त्यांनीच जखमींना पट्ट्या बांधल्या.
खजिना लुटीची माहिती कळताच पोलिस खाते खडबडून जागे झाले. शिंदखेडे येथून पोलिसपार्टी क्रांतिकारकांचा शोध घ्यायला
निघाली.त्यांची आणि पोलिसांची गाठ रूंदाणे
(ता. साक्री) या गावाच्या शेतात पडली.
उभयपक्षी गोळीबार झाला.अर्ध्या तासाने
अंधार पडला म्हणून पोलिस लामकानी गावी
निघून गेले.या गोळीबारात क्रांतिकारकांपैकी
श्री.जी.डी.लाड यांच्या पायाच्या पोटरीतून
गोळी आरपार गेली.श्री.नागनाथ नाईकवडी
यांच्या छातीत गोळी लागून ते जखमी झाले.
तर श्री.रावसाहेब कळके यांच्या मनगटात गोळी रूतून बसली.ती त्यांनी मुंबईला जाऊन काढली.डॅा. उत्तमराव पाटीलहे क्रांतिकारकांच्या बरोबर असल्याने त्यांनी या जखमींवर प्राथमिक उपचार केले ….
पोलिसखाते जागे झाले आहे, ते आपल्या
पाळतीवर आहे याची गोळीबारामुळे
क्रांतिकारकांना जाणीव झाल्याने आपण
सर्वांनी आता एकत्र राहणे धोक्याचे आहे.
सर्वजण एकत्र पकडले जाण्यापेक्षा आपण
जर दोन टोळ्यात विभागलो गेलो तर त्यामुळे
पोलिसही फसतील आणि आपल्यापैकी
पकडले गेले तर काहीच पकडले जातील
असा विचार करून क्रांतिकारकांनी स्वत:ला
प्रत्येकी चारच्या टोळीत विभागून घेतले.
एका टोळीचे नेतृत्व डॅा. उत्तमराव पाटलांनी
केले तर दुसऱ्या टोळीचे नेतृत्व श्री.शंकर पांडू
माळी यांनी केले.कारण उरलेले क्रांतिकारक
साताऱ्याचे होते.त्यांना अहिराणी भाषा येत नव्हती.तेंव्हा प्रत्येक टोळीत अहिराणी जाणणारा क्रांतिकारक आवश्यक होता.
तसेच रस्त्यांची व गावांची माहिती ही सातार
करांना माहित असणे शक्य नव्हते.त्यामुळे
डॅा. उत्तमराव पाटील आणि श्री.शंकरराव माळी
यांच्या नेतृत्वाखाली दोन विभागात ही मंडळी
विभागली गेली.
श्री.शंकर पांडू माळी यांची टोळी मेहेरगाव मार्गे
धुळे येथे १५/४/१९४४ रोजी भल्या पहाटे येऊन
पोहोचली.तेथून ते वडजईला गेले .
दुसरी टोळी डॅा.उत्तमराव पाटील यांची, ती
हाट खोबरे गावी पोहोचली.तेथील एक शिक्षक
केशव वाणी यांनी त्यांना भाड्याने टांगा करून
दिला. चहा -नास्ता दिला.या गावातून बाहेर
पडतांना रस्त्यात पोलीस पार्टी आडवी आली.
पण गाडीला पडदे लावले असल्याने पोलिसांनी फारशी चौकशी केली नाही ….
देऊर गावी पुन्हा श्री. सावंत, पोलिस इन्स्पेक्टर
आणि क्रांतिकारकांची भेट झाली.पण क्रांतिकारक देऊरच्या शेतात उतरले असल्याने
ते पकडले गेले नाही……
बरंय् मंडळी, भेटू पुढच्या भागात.राम राम.
जयहिंद.. जय महाराष्ट्र.
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)