पुणे :
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांना अकरावी प्रवेश घेण्यास विलंब होत आहे. तसेच अद्याप निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या देखील कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहिल्या नियमित गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता शुक्रवारपर्यंत (ता. ४) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. तसेच अकरावीच्या दुसरी नियमित गुणवत्ता यादी १० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे,”अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर करण्यात आली होती.
या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी यापूर्वी गुरुवारपर्यतची (ता.३) मुदत दिली होती. परंतु आता प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्या लॉगिनमध्ये त्यांनी ‘प्रोसीड फॉर एडमिशन’वर क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा. त्यानंतर एडमिशनचे पत्र प्रिंट काढून ठेवावे. चुकिने प्रोसीड फॉर एडमिशन केले असल्यास ‘अनडू प्रोसीड’ची सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये दिली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडायचे असल्यास आणि इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्या विद्यार्थ्यांनी ‘विड्रॉवल ऑफ एप्लीकेशन’ सुविधेचा वापर करावा. तसेच ‘विड्रॉवल ऑफ एप्लीकेशन’ या सुविधेचा वापर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा अर्ज सिस्टीममधून रदद् होईल. परंतु एखाद्या विद्यार्थ्यांने चुकुन ‘विड्रॉवल एप्लिकेशन’ हे बटण क्लिक केले असल्यास हा अर्ज पुन्हा ‘अनविड्रॉव’ करण्याची सुविधा शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगिन दिली आहे.
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
* तारिख/ वेळ : कार्यवाहीचा तपशील*
*४ सप्टेंबर (रात्री दहा वाजेपर्यंत) : -नियमित प्रवेश फेरी- दोन करिता रिक्त पदे दर्शविणे.
(यामध्ये रिक्त असलेल्या तसेच कोटयातुन प्रत्यर्पित केलेल्या रिक्त जागांचाही समावेश असेल.)
*५ सप्टेंबर (मध्यरात्री ००.०५ पासून) ते ७ सप्टेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यत) : – नियमित दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे (अर्जाचा भाग दोन) सुरु. – यापूर्वी भरलेल्या भाग दोन मधील पसंतीक्रम बदलता येतील. – या कालावधीत नवीन विद्यार्थी प्रवेश अर्ज भाग एक आणि भाग दोन भरु शकतील. – मार्गदर्शन केंद्र/ माध्यमिक शाळा येथे विद्यार्थी अर्ज व्हेरिफाय आणि एडिट करू शकतील. -व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोटयांतंर्गत प्रवेशासाठी विद्यालयांना अर्ज मागविता येतील.
– प्रवेश अर्ज भाग एक भरणे, व्हेरिफाय करणे आणि भाग दोन भरणे बंद होईल.
*८ आणि ९ सप्टेंबर : डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम करणे. संबंधित विभागीय समित्यांनी एलोकेशन लॉजिक नुसार परीक्षण करणे.
*१० सप्टेंबर (सकाळी १० वाजता) : नियमित प्रवेश फेरी – दोन अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे. दुसऱ्या नियमित फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे. विद्यार्थ्यांना याबाबत मोबाईल संदेश पाठविणे.
*१० सप्टेंबर (सकाळी ११ वा. पासून) ते १२ सप्टेंबर ( सायंकाळी ५ वा. पर्यंत) : – मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्यांने प्रोसीड फॉर एडमिशन करणे. – विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे. – कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन निश्चित करणे, घेतलेले प्रवेश रद्द करणे, अथवा प्रवेश नाकारता येणे. – व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोटयातील प्रवेश सुरू राहतील. – व्यवस्थापन कोटयाअंतर्गत जागा प्रत्यार्पित करता येतील. – नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे सुरू होईल. (पुढील प्रवेश फेरीसाठी)
*१२ सप्टेंबर (रात्री ८ वाजेपर्यंत) : झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ.
*१२ सप्टेंबर (रात्री १० वाजता) : प्रवेशाची नियमित फेरी- ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. (यामध्ये रिक्त राहिलेल्या तसेच कोटयातून प्रत्यार्पित केलेल्या रिक्त जागांचाही समावेश असेल)
विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना :
– पहिला पसंतीक्रमा मिळाला असल्यास विद्यार्थ्यांने निवडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
– प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना केवळ विशेष फेरीमध्ये संधी मिळू शकेल.
– विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करावा.
– घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.