*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री नीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आठवणीतील दिवाळी*
आता सर्व सुख सोयींनी युक्त असं सर्व काही असले तरी, जवळ जवळ सर्वांच्याच आठवणीतील दिवाळी म्हणजे जुन्या लहानपणीच्या च दिवाळी असं असतात.
दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एखादी तरी स्मित रेषा येतेच. बालपणीच्या त्या रम्य दिवसातील दिवाळी आठवते. सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर कधी होतो असं व्हायचं. तो पेपर दिला की फ्री बर्ड सारखं उडत उडतच घरी यायचं, दप्तर फेकायचं नी हुंडायला जायचं. पण मी तर पुढच्या दोन दिवसात continue बसून सुट्टीचा गृहपाठ करून टाकायचे ,म्हणजे पुन्हा टेन्शन नको. मग दिवाळीच्या आनंदात बिनघोर सामील व्ह्यायचं.
पूर्वी पैशाची चणचण असली तरी, मनं मोठी होती, ती असलेली पैशाची कमी आमच्या पर्यंत कधी पोहोचलीच नाही, म्हणजे आम्ही आहे त्यातच समाधान मानायचो. आई वडिल आपल्याला भरभरून देणारच हिच मनाची धारणा होती.
दिवळीला च काय तो मिळाला तर एखादा नवा ड्रेस मिळायचा, तो ही एका ताग्यातलंच कापड घेऊन मला आणि मोठया बहिणीला फ्रॉक शिवला जायचा. तोच आम्ही प्रत्येक सणा सुदीला वर्षभर पुरवून घालायचो. वडिल दिवाळी advance घ्यायचे पगारातून. त्यातूनच फराळाच्या पदार्थांच्या वस्तू आणल्या जायच्या, नवीन गोल साबण, उटणं, रंगीत वासाचं तेल, डालडा चा डबा आणि लिमिटेड फटाके आम्हा भावंडाना आणले जायचे. किती अप्रूप वाटायचं या सगळ्यांचं !! आकाश कंदिल घरीच शक्यतो जिलेटीन पेपर आणि कामट्यांचा बनवला जायचा सर्व घरातून. पण आमच्या कडे आकाश दिवा कोणत्या तरी कारणाने लावणं धार्जिन नसल्याने तेवढी गोष्ट नसायची आमच्या कडे.अवती भोवतीची मुलं मिळून आमच्या अंगणात किल्ला बनवायचो.
आणलेल्या फटाक्यांच्या भावंडात वाटण्या व्हायच्या. अगदी लवंगी फटाक्यांच्या सर उलगडून सुध्दा वाटण्या केलेल्या आठवतात. आमच्या शेजारी पोलीस मध्ये असलेले एक जण राहायचे, त्यांना कुठून कुठून फुकट फटाके मिळत. मग त्यांची मूलं आमच्या समोर ते फटाके खूप वेळ उडवत असत. आम्ही आमचे वाटणीतले लिमिटेड फटाके उडवून , त्यांची आतिषबाजी बघत बसायचो.तेव्हा खूप वाईट वाटायचे.
आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे दिवळीच्या आधी 8-10 दिवसा पासून दारात सडा टाकून सुंदर सुंदर रांगोळ्या घालण्याचा आनंद असे. अंगणभर रांगोळ्या सकाळ, संध्याकाळी घालायचो. आमचं घर तर अगदी मुख्य रस्त्यावर होतं, सगळी वाहनं तिथूनच जायची, अर्ध्या तासात रांगोळ्या पुसल्या जायच्या, पण ती हौस दांडगी, पुन्हा पुन्हा रांगोळ्या घालायच्या.
मला अजूनही आश्चर्य वाटतं , दिवाळीला किंवा केव्हाही पाहुणे रावळे घरी आले , 8-8 दिवस राहिले तरी ,तुटपुंज्या कमाईत आई वडिल हसत मुखाने कसं निभावून न्यायचे ? म्हणजे आर्थिक आणि शारीरिक कष्टाने कधीच कुरकुर दिसली नाही मला. आता विचार केला तर वाटते, हल्ली एखादं दुसरा पाहुणा आला तरी लोकांना जड वाटतो. कोणी कोणाकडे येणं नाही नी जाणं नाही. मुलं तर आपली रूम शेअर करायला सुद्धा तयार नसतात. प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते..
पहिले दिवशी बम्ब पेटवून पाणी कडकडीत गरम करून , अंगाला सुगंधी तेल मॉलिश करून आई आम्हाला अभ्यंग स्नान घालायची, स्नानाच्या वेळी आम्ही बहीण भावंड आलटून पालटून फटाके वाजयचो प्रत्येकाच्या अंघोळीच्या वेळी. किती तो आनंद अवर्णनीय असे. मग फराळ वाढला जायचा, किती हसत खेळत ,मजा करत फराळ असे तो. नंतर शेजारी पाजारी, ओळखीचे सर्वांना दिवस ठरवून फराळाला बोलावलं जायचं. एकमेका कडे फराळाची ताटं दिली घेतली जायची. किती छोट्या गोष्टीत ,मोठा आनंद भरलेला असायचा !!
नंतर लग्न झाल्या नंतरच्या जबाबदारी च्या दिवाळ्या सुरू झाल्या. स्वतः फराळ बनविणे, मोठ्यांचा मान राखून जवळच्या सर्वांना जेवायला, फराळाला बोलावणे . आनंदात कमी नव्हतं पण , स्वतः च्या जबाबदारीवर नोकरी सांभाळून सर्व करावं लागे. कपडे, साड्या घेणं चालूच असे, पण बालपणीच्या दिवाळीची मजा काही औरच असते, मनात आणि हृदयात साठवलेले ते अविस्मरणीय क्षण कधीच विसरणार नाहीत.
आताची तर गोष्टच न्यारी, कशालाच काही कमी नाही, ना पैशाला ,ना वेळेला , (म्हणजे रिटायर्ड असल्याने) पण पूर्वीचा उत्साह राहिलेला नसतो, गोड खायचं म्हंटलं तरी डायबेटीस मुळे मोजूनच खावं लागतं. नव्या भारी साड्या नेसून तरी आता कुठं जायचंय असं वाटतं. मुला नातवंडांच्या आनंदा चा आनंद आहेच हो, पण छोट्या घरात पण मोठ्या आनंदात साजरी केलेली दिवाळी खूप आठवते, ती मजा आता मोठया घरात येत नाही. कालमानाप्रमाणे सणांचे स्वरुप ही पालटले आहे, आता प्रेस्टीज इशू म्हणून विकतचे मिठाई बॉक्स गिफ्ट दिले जातात , घरी केले पदार्थ तरी . पण घरी केलेल्या फराळाच्या ताटाची सर त्याला येत नाही. पदार्थाना नावं ठेवत म्हणा, नावाजत म्हणा प्रत्येक पदार्थ आवडीने खाल्ला जायचा.
हं … शेवटी काळा प्रमाणे बद्ललं च पाहिजे . कालाय तस्मय नमः ।
नीता कुलकर्णी
हैद्राबाद