*जिल्ह्यात राष्ट्रवादीचं अस्तित्व काय..?*
*पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षाबाहेर काढून जिल्ह्यात राष्ट्रवादी किती शिल्लक राहणार..?*
राजकिय विशेष…
एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड आणि सावंतवाडी अशा दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार लढत देत होते. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. देवगड मध्ये नंदूशेट घाटे, सावंतवाडीत दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला टिकवून ठेवले होते. परंतु केसरकर राष्ट्रवादीला रामराम करून बाहेर पडल्यानंतर सौ. अर्चना घारे परब यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांना बळ देऊन राष्ट्रवादी पुन्हा रुजवली. राष्ट्रवादीचा पानगळ झालेला वृक्ष आज नव्याने बहरू लागल्यावर जनाधार नसलेले जुने जाणते आणि शेला पागोटे बांधून काल परवा पक्षात आलेले नवे कार्यकर्ते हाच बहरात असलेला वृक्ष तोडून शेजारच्या मांडवात सावली देण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी (श. प.) संपवायला निघालेत की काय..? असा प्रश्न पडतो.
जनतेच्या पाठिंब्यावर सौ.अर्चना घारे परब यांनी पक्षाने बळ दिले म्हणून निवडणुकीची तयारी केली. त्या निवडून येतील अशी खात्री झाली असतानाच एक महिला वरचढ होते, मतदारसंघात महिलांची ताकद वाढते हे ज्यांना टोचू लागले त्यांनी हळूहळू त्यांचा पाठिंबा काढून घेत दुसऱ्याच्या छावणीत त्यांच्या बंदुका सांभाळण्याचे काम सुरू केले. पक्षादेश हा गोंडस शब्द वापरून सौ अर्चना घारे परब यांच्या सोबत काम करणाऱ्या आणि ज्यांनी राष्ट्रवादी मध्यंतरीच्या काळात वाढवली त्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे काम करण्यास सांगून अर्चना यांच्या सोबत राहिल्यास, त्यांचा प्रचार केल्यास पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उचलण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पण ज्यांनी अशा धमक्या दिल्या त्यांना जनाधार आहे का..? पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी किती प्रामाणिक प्रयत्न केले..? एखादी ग्रामपंचायत तरी निवडून आणली का..? समाजावर संकटे आली तेव्हा कुणाला १००/- रुपये तरी स्वतः आर्थिक मदत दिली का..? ज्यांच्या खिशातून दमडी निघत नाही पण पक्षातील वरिष्ठांच्या कृपेवर पक्षाची महत्त्वाची पदे पडतात ती घालून मिरवण्यात धन्यता मानली तेच पक्षाचे नेते आज राष्ट्रवादी पक्ष आधीच तुटलेला असताना त्याच्या उरल्यासुरल्या फांद्या तोडून टाकण्याची भाषा करतात हे राष्ट्रवादीचे दुर्दैव आहे. सावंतवाडी तालुक्यात दीपक केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झालेल्या उबाठा ची ताकद केवळ कट्टर शिवसैनिकांच्या मतांवर कायम राहिली असताना राष्ट्रवादीच्या काठीवर भविष्यात उबाठा आपले वर्चस्व दाखवून देईल परंतु सावंतवाडी तालुक्यातून, मतदार संघातून राष्ट्रवादी (श. प.) रसातळाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
जनतेला दिलेला शब्द न मोडता आणि म्हाताऱ्या शिताऱ्या लोकांच्या थरथरणाऱ्या हातांनी दिलेला आशीर्वाद याच्या जोरावर, तसेच गेली आठ वर्षे मतदारसंघात राष्ट्रवादी उभी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांच्या जोरावर सौ.अर्चना घारे परब यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीला मतदारसंघात जिवंत करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी राष्ट्रवादीचे आम्हीच नेते असे म्हणत आणि जनाधार संपलेले नेते राष्ट्रवादी तोडायला निघालेत. सावंतवाडी मतदारसंघात जर राष्ट्रवादीला पूर्वीचे दिवस दाखवायचे असतील तर राष्ट्रवादीने त्यांच्या मागे आपली ताकद लावणे आवश्यक होते. पण जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात उबाठा (शिवसेना) लढत असताना त्यांच्या मागे आघाडी धर्म म्हणून फरफटत जाणाऱ्या राष्ट्रवादीने आपली पत काय ठेवली..? एकीकडे बबन साळगावकर, उमेश कोरगावकर हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून वावरत होते आज ते शिवसेनेच्या छावणीत हळूच जाऊन बसलेत; राष्ट्रवादी पोखरली जात आहे तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उबाठा ची वस्त्रे सांभाळण्यात का व्यस्त आहे..? याचे उत्तर मात्र पडद्यामागील भेटीत लपले आहे की काय..? असा अनपेक्षित सवाल उभा राहत आहे…
कारण..,
केवळ पक्षादेश म्हणून कोणीही स्वतःला दुसऱ्याच्या दावणीला बांधणार नाही…