महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची प्रतिक्रिया
कुडाळ :
वैभव नाईक तुमच्या पायाखालची जमिन सरकत आहे. म्हणून उबाठात खोटे पक्ष प्रवेश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. मात्र मी निवडणुकीचा स्तर खाली जाऊ देणार नाही. मी तुमच्यावर टीकाही करणार नाही. मी उलट तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छाच देतो. फुल प्रयत्न करा. जे काही आहे ते पणाला लावा फक्त खरे करा. असा मार्मिक टोला लगावत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या काही दिवसात उबाठात केलेल्या पक्षप्रवेशांची पोलखोल केली.
पक्षप्रवेश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार वैभव नाईकांचा सुरु आहे, तो चालू ठेवला तरी काही फरक पडत नाही. कारण लोकांना सगळे माहिती आहे. पण एक आमदार म्हणून कुठल्या दर्जाचे काम केले पाहिजे ते काम दहा वर्षात तुम्ही केले नसले तरी हे असे पक्ष प्रवेश दाखवून जो काय तुमचा उरलेला स्तर आहे तो तुम्ही स्वतःहूनच खाली आणत आहात. मागच्या दहा वर्षात केले नाही मात्र आता तरी लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय हवे आहे यांचा विचार करून लोकांना आधार वाटेल असा प्रचार करा. उबाठा गटाकडून या मतदारसंघात अशा खोट्या गोष्टी केल्या जातात ते लोकांसमोर येणे गरजेचे आहे. जे पक्ष प्रवेश दाखवले जातात ते किती खोटे आहेत, हे लोकांना समजायला हवे. म्हणून बोलतोय. मी कोणतीही टीका करणार नाही. असेही निलेश राणे म्हणाले.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मागच्या काही दिवसापासून आमच्या नावाने म्हणजे भाजप व शिवसेना मधून उबाठा प्रवेश असे भासवण्याचा खोटा प्रयत्न हा उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या कडून केला जात आहे. एक दोन व्यक्ती पकडून गळ्यात पट्टी टाकून प्रवेश दाखवत आहेत.
१७ ऑक्टोबरला जांभवडे गावातील खेचरे कुटुंबातील तीन व्यक्तींचा प्रवेश दाखवला गेला पण ज्या व्यक्तींनी प्रवेश केला असे दाखवले गेले ते आधीपासूनच उबाठा पक्षाचे होते. त्याचबरोबर जांभवडे गावातील चिंतामणी मडव या एक व्यक्तीचा प्रवेश भाजप मधून उबाठा मध्ये प्रवेश दाखवला गेला. मात्र त्यांचा भाजप किंवा राणे कुटुंबीय यांच्याशी काहीच संबंध नव्हता. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्रिंबक मध्ये घाडी कुटुंबातील एका व्यक्तीचा प्रवेश केला. त्यावेळी असे दाखविण्यात आले की घाडी हे भाजप किंवा राणे कुटुंबीय यांच्याशी फार जवळचे होते. पण जर त्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्ट बघितले तर २०१७ पासून त्यांचे वैभव नाईक यांच्या सोबतचे पोस्ट आहेत.
त्यानंतर मालवण कुंभारमाठ येथील माजी सरपंच वैशाली गावकर यांचा पक्ष प्रवेश दाखविण्यात आला ते हास्यास्पद होते. कारण गावकर या अनेक वर्ष उबाठा पक्षामध्येच होत्या.त्यानंतर धनगर वाडीतील मोडक कुटुंबातील मोडक नावाच्या व्यक्तीचा पक्षप्रवेश दाखवला गेला. मुळातच त्यांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, वर्दे गावातून अरविंद सावंत यांचा उबाठा मध्ये प्रवेश दाखवला गेला. यांना आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीला तिकीट नाकारले होते त्याला अनेक वर्ष झाली त्यानंतर अरविंद सावंत आमच्या संपर्कात नव्हता. कारण आम्ही त्यांचा स्वभावामुळे तिकीट नाकारले होते, त्यांचे काही उपद्याप होते. त्यामुळे ते सक्रिय नव्हते आणि तेव्हाच ते तिकडे गेले पण तरी देखील त्यांचा परत पक्ष प्रवेश दाखवला गेला.त्यानंतर सदानंद अणावकर ते २०१३ पासून राजकारणात सक्रिय नाही. आमची ओळख होती हे बरोबर आहे पण ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजकारणापासून दूर गेले होते. त्यामुळे त्यांच्या आमच्याशी थेट संपर्क नव्हता पण आता त्यांनी पक्ष प्रवेश करून जरी सक्रिय झाले असतील तर त्यांची कारणे आम्ही बघून घेऊ पण तरी पण हे जे सगळे पक्ष प्रवेश दाखवले आहेत. ते कोण राजकारणात नाही, तर कोण सक्रियच नाहीत असे आहेत. एखादा गावातला असा व्यक्ती शोधायचा ज्याला गावाला नाकारले अशा व्यक्तीच्या गळ्यात पट्टी टाकायची आणि मग तो प्रवेश दाखवायचे काम वैभव नाईक करत आहेत. असे सांगत निलेश राणे यांनी पोलखोल केली.