You are currently viewing 5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त अमरावतीचे माणिक : प्रा. एम टी देशमुख 

5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त अमरावतीचे माणिक : प्रा. एम टी देशमुख 

 

प्रा. बी टी देशमुख यांचे नाव जसे नुटाचे संस्थापक अध्यक्ष क्रियाशील व सतर्क आमदार तसेच जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारे म्हणून नावलौकिकास आहे तसेच नाव त्यांचे लहान बंधू प्रा.एम टी देशमुख यांचे नाटकाच्या क्षेत्रामध्ये आहे. एम टी देशमुख यांचे नाव माणिक आहे आणि त्यांनी नाट्य क्षेत्रात जी कामगिरी केलेली आहे त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने अमरावतीचे माणिक म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे हा प्राध्यापक माणूस. प्राध्यापकाने यावे वर्गात शिकवावे पगार घ्यावा. मी माझी पत्नी माझी मुलगी व माझा मुलगा या गोतावळ्यात राहावे अशी एकंदर आचारसंहिता. पण ही आचारसंहिता एम टी देशमुखांनी केव्हा सोडली. सोडली म्हटलं पेक्षा तोडली. वहिनी रजनीताई आमच्या भारतीय महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या प्रमुख. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या विद्याभारती महाविद्यालयामध्ये स्वतः नाना प्राध्यापक. बी . टी सरांचा भाऊ म्हणजे भाऊंचा लाभांकित माणिक. पण या माणसाने ही बिरुदे केव्हाच मिरवली नाहीत. खऱ्या अर्थाने त्यांनी क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र नाट्य शास्त्र नुटा याला वाहून घेतले.. अभिरुची क्रीडा मंडळ अमरावती नावारूपास आणले. विद्याभारती महाविद्यालयामध्ये क्रीडापटूंची चांगली टीम तयार केली.. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समितीवर असताना खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळवले .तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचया क्रीडा प्रकाराला पूर्ण भारतामध्ये बहुमान प्राप्त करून दिला. पण त्यांच्या लक्ष होतं ते नाट्य क्षेत्राकडे. नाटकाची त्यांना भारी आवड. सुमारे 30 वर्षांपूर्वी मी जेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर युग निर्माता नाटक बसविले तेव्हा पंजाबराव चे वडील म्हणून एमटी देशमुख यांनी केलेली भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे .आणि त्यांनी सादर केलेला गाडगेबाबा तर श्रीराम लागूनाही लाजवणार आहे. कारण एमटी देशमुख गाडगे बाबाच्या भूमिकेत राहिले. गाडगे महाराजा सारखे वागले आणि गाडगे महाराजांचे अंतरंग त्यांनी जाणून घेतले. आणि खरा खऱ्या अर्थाने वऱ्हाडी माणसावर वराडी मातीवर मराठी भाषेवर त्यांचे प्रेम असल्यामुळे त्यांनी साकारलेला गाडगेबाबा लोकांच्या हृदयात जाऊन बसला. युगनिर्मातानंतर मी गाडगेबाबा नाटकाची निर्मिती केली. विद्याभारती कॉलेज. विद्यापीठ .पत्नी, मुलं विद्यापीठ स्पर्धा हे सारं सांभाळून या माणसाने गाडगे महाराजांना न्याय दिला. खरं म्हणजे नाट्य कलावंतांचे कधी कधी चोचले पुरवताना दम लागतो. पण प्राध्यापक एम टी देशमुख याला अपवाद आहेत. युगनिर्माता असो की गाडगेबाबा या माणसाने स्वतःहून स्वतःला वाहून घेतले. मला कोणत्याही त्रास दिला नाही .आमचा एक वेळ दारव्यालाला प्रयोग होता. तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्री अरुण कुमार डोंगरे यांनी तो आयोजित केला होता. आमची नाटकाची टीम अगोदरच त्या गावाला पोचली होती. नानाना विद्यापीठाची मीटिंग होती. ते स्वतःची गाडी घेऊन नाटकाला आले. तेव्हा आमची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. मी नानांना गाडी भाड्याविषयी विचारले. त्यांनी माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहिले. आणि मिश्किलपणे हसले .काहीच बोलले नाहीत. आणि उजव्या हाताने सारं काही ऑल बेल असा मला संकेत दिला. गाडगे महाराजांचे आणि युग निर्माताचे आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग केले. मी तेव्हा मिशन आय ए स सुरू करायचे होते. अधिकारी वर्गांचा फारसा परिचय नव्हता .नाटकाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे फारच जोखमीचे काम होते. त्यातही नाटकाचा प्रयोग फसला म्हणजे पुरते बुडालो. पण तीस वर्षांपूर्वीही लोकांनी समर्थपणे साथ दिली. आमचे मित्र व तत्कालीन अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री रवींद्र जाधव अमरावतीचे तत्कालीन विभागीय आयुक्त श्री ह रा कुलकर्णी अरुण कुमार डोंगरे दिलीप स्वामी प्राध्यापक राम मेघे प्राचार्य अण्णासाहेब हिवसै ही सारी मित्रमंडळी मदतीला आली आणि आम्ही गाडगेबाबा संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवला. नाटकाचे दिग्दर्शक प्राध्यापक सतीश पावडे असल्यामुळे मला तालमीकडे फारसे लक्ष द्यावे लागले नाही .ती बाब सतीशने समर्थपणे सांभाळली. त्यामुळे मला वर्गणी करायला तिकिटे विकायला सोयीचे झाले. त्यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याचे वाईट अनुभव आले. पण आम्ही गाडगे महाराजांसाठी पंजाबराव देशमुख यांसाठी तेही विष पचवले. क्रांती योगी गाडगेबाबा खूपच गाजला. अनेक प्रयोग नानांनीच लावले. त्यांच्या ओळखी पाळखी भरपूर आणि आमच्या नाटकाचे बजेट म्हणजे पंधरा हजाराचे. त्यामध्ये जाणे येणे कलावंतांचे मानधन खाणे पिणे सगळे आले. एवढ्या मानधनात तर आज साधा वक्ता येत नाही. पण त्या काळात आम्ही पंधरा हजारात पूर्ण टीम महाराष्ट्रभर फिरवली. आमचे कलावंत हौशी होते. त्यांना मानधन मिळाले की नाही यापेक्षा त्यांना स्टेज मिळाले हे महत्त्वाचे होते. आज त्याच नाटकातला नरेंद्र मुधोळकर रंगभूमी गाजवत आहे. नाना आमच्यापेक्षा वयाने मोठे. माझा अर्थार्थी नाट्य या प्रकाराशी फक्त एम ए मराठीत असल्यामुळे संबंध. पण आमच्या युगनिरमातामध्ये आणि गाडगेबाबांमध्ये नानांची भूमिका ही वडिलांसारखी होती. त्याच भावनेने ते माझ्याशी वागत होते. बोलत होते आणि अडचणीला धावून येत होते. आज मराठी रंगभूमी दिन नानांवर लिहिता येण्यासारखे खूप आहे. पण तुर्त एवढेच पुढे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व रंगकर्मीला हार्दिक शुभेच्छा…

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा