You are currently viewing अणाव मध्ये भाजपला धक्का

अणाव मध्ये भाजपला धक्का

*कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अनावकर यांनी हाती घेतली मशाल*

 

*कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका…*

कुडाळ :

शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसेनेत संघटनेला खूप महत्व आहे. संघटितपणे एकनिष्ठपणे राहून आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि वैभव नाईक यांना अणाव गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया निवडून आणून पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवूया.अणाव गावचा इतिहास आहे की, एकदा शब्द दिला की त्याच्याशी ठामपणे पाठिशी राहतात, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अणावकर यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, कुडाळ तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे.काल कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील कट्टर राणे समर्थक उपसरपंच सदानंद अनावकर व नागरिकांनी विद्यमान आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले सदानंद अणावकर यांनी स्पष्ट केले की, यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार वैभव नाईक हेच विजयाची हॅट्रिक करतील. यावेळी सदानंद अणावकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, कुडाळ-मालवण मतदारसंघामध्ये घराणेशाहीला आपण थारा देता कामा नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदार-आमदार हे एकाच कुटुंबातील आहेत. तर यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांचा विकास होणे गरजेचे होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही. जिल्ह्यात केवळ घराणेशाहीच दिसून आली. परंतु, यावेळी विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा विजयी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अणाव गावामधून सर्वाधिक मताधिक्य यावेळी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनाच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागील दहा वर्षात अणाव गावामध्ये अनेक विकासकामे आमदार वैभव नाईक यांच्या विकासनिधीतून झाली आहेत. आज राज्यातील महायुतीचे सरकार हे केवळ धनाड्यांचे सरकार आहे. मात्र, सामान्य जनतेला या सरकारने काहीच दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, शिंदे सरकारच्या काळात हा विकासनिधी खुंटला असल्याची टीकाही अणावकर यांनी यावेळी केली.

मागील निवडणुकीमध्ये एक दिलासा म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना येथील जनतेने खासदारकीच्या निवडणुकीत निवडून दिले. मात्र, खासदार झाल्यापासून नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोणती कामे केली हे त्यांनी जनतेला सांगावे, असा प्रश्नही अणावकर यांनी उपस्थित केला.

यावेळी विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी आपण कुडाळ-मालवणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. मागील १० वर्षांमध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघात अनेक विकासकामे ही करण्यात आली आहेत. रस्ते, पूल, पाणी योजना या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात पूर्णत्वास आल्या असेही आमदार वैभवने यांनी म्हटले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गावातील शिवसेनेत प्रवेश केलेले सदानंद अणावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. आपण विकासासाठी शिवसेनेत आलात त्यामुळे आपला योग्य तो सन्मान राखला जाईल असेही आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिले. मागील दहा वर्षांमध्ये या विभागाचा आमदार म्हणून काम करताना मी सामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत हे जवळून पाहिले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नही केले आहेत.

परतीच्या पावसामुळे या भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पाच वर्षापूर्वी सुद्धा परतीचा पावसामुळे या भागात भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तत्काळ भरपाई शेतकऱ्यांसाठी लागू केली होती. अणाव गावातील अनेक विकासकामे पूर्णत्वास झालेली आहेत. येथील पूल मंदिरासमोरील सुशोभीकरण, रस्ते हे पूर्ण झालेले आहेत. आम्ही सातत्याने लोकांमध्ये जात असतो आम्हाला भीती असते की, उद्या आम्ही लोकांमध्ये गेल्यानंतर लोक आम्हाला काय विचारतील त्यामुळे आम्ही नेहमीच विकासकामे करण्यावर भर देतो.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबीयांवर टीका करताना म्हटले की, एकीकडे खासदार आहेत, एक मुलगा आमदार आहे. यांना तुमचा विकास करायचा नाही तर त्यांना आपल्या घराचे वासे बदलण्यासाठी विकास करायचा आहे. राणे केंद्रात मंत्री होते. परंतु, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती उद्योग आणले हे त्यांनी स्पष्ट करावे. आज नियती कशी बघा ज्या बाळासाहेबांना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच आज बाळासाहेबांचा धनुष्यबाण घ्यावा लागतो. धनुष्यबाण घेताना लाचार होऊन घ्यावा लागतो.

भाजप नेहमी सांगते पहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः पण राणे हे जिथे असतात तिथे पहिला मुलगा, दुसरा मुलगा आणि तिसरी सत्ता असते. हे आपल्याला नको आहे. हे आपण जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे असे आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले की, २००५ मध्ये आपण शिवसेना सोडली असे लोकांना सांगितले. मात्र, खरे असे आहे की बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लाथ मारली त्यावेळी राणींनी लोकांना भावनिक साथ घातली.

राणे हे स्वतः धृतराष्ट्र झाले आहेत ते दुसऱ्यांना धृतराष्ट्र म्हणतात. राणे आजही मुलांचे बालहट्ट पुरवितात. नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना औषधाला ठेवणार नाही, धनुष्यबाण संपवणार वक्तव्य केले होते. नियती कशी आहे बघा !ही परशुरामाची भूमी आहे इथेच करा आणि इथेच भरा. नारायण राणे यांना चोरीला धनुष्यबाण घ्यावा लागला आणि चोरलेली शिवसेना घ्यावी लागली हे त्यांचे दुर्दैव आहेच पण कार्यकर्त्यांचेही दुर्दैव आहे. जे त्यांचे जुने सहकारी होते त्यांचे आता डोळे उघडले आहेत. राणे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काम करतात हे त्यांना समजले आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी अणावचे माजी उपसरपंच सदानंद अणावकर, अणाव ग्रामपंचायत उपसरपंच आदिती अणावकर, सदस्य रावजी जिकमडे, भगवान परब, अनंत परब, जनार्दन परब, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, अमरसेन सावंत, जयभारत पालव, सचितानंद पालव, सुनिल कुळकर्णी, अणाव शाखाप्रमुख बाबा परब, अणाव माजी उपसरपंच चंद्रशेखर मालवे, संतोष बागवे, दाजी पालव, बाळू पालव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा