मालवणातील अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करा..
मालवण
मालवण येथील बस स्थानक लगतच्या रस्त्यावर एक फळ विक्रेता गुटखा खाऊन फळांवर थुंकताना सापडला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच येथील पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद असलेल्या तसेच अधिकृत परवाने असणाऱ्या व्यक्ती वगळता सर्व अनधिकृत फळ विक्रेत्यांवर सरसकट कारवाई करण्यात यावी, असे निवेदन मालवण मधील तरुण सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने पोलीस ठाणे तसेच मालवण पालिका प्रशासनासही देण्यात आले आहे.
या घडलेल्या प्रकारामुळे फळ विक्रेत्यांवरील नागरिकांची विश्वासार्हता कमी झाली आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उद्भवला आहे. फळ विक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर आपली हातगाडी लावून फळे विकतात. त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीच्या त्रासाला मालवणवासियांना सामोरे जावे लागते. अधिकृत फेरीवाले किती याची कोणालाच माहिती नसते. घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. भविष्यात असे प्रकार घडत राहिल्यास नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येतील. त्याआधीच आपण फक्त अधिकृत नोंद असलेल्या तसेच पोलीस ठाण्यात ज्या व्यक्तींची नोंद आहे अशा अधिकृत परवाने असणाऱ्या व्यक्ती वगळता सर्व अनधिकृत फळविक्रेत्यांवर सरसकट कारवाई करावी. मात्र हि कारवाई दिखाऊ असू नये तर कठोर स्वरूपात असावी जेणेकरून असले प्रकार पुन्हा होणार नाहीत व मालवणातील रस्ते देखील वाहतूक कोंडीतून मुक्त होतील अशा मागणीचे निवेदन पोलीस ठाण्यास तसेच पालिका प्रशासनासही देण्यात आले आहे.