You are currently viewing आली माझ्या घरी ही दिवाळी…

आली माझ्या घरी ही दिवाळी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*आली माझ्या घरी ही दिवाळी…*

 

उठा उठा दिवाळी आली

मोती स्नानाची वेळ झाली

 

पहाटे पहाटे हा मुलगा शेजारच्या दारांवर टकटक करत सर्वांना उठवत जातो…ही जाहिरात मला फार आवडते. दिवाळी आणि मोती साबण , सुगंधी तेल, उटणं यांचा सरमिसळ झालेला सुगंध म्हणजे दिवाळीची पहाटवेळ असं काहीतरी लहाणपणापासूनच मनावर कोरल गेलय.

मॉलमध्ये तर सगळेच साबण आपल्याला बारमाही मिळतात,पण काही गोष्टींचं औचित्य हे ज्या त्या वेळीच साधलेलं छान वाटतं. ही किमया त्या एच यू एल कंपनीची. जेव्हा टीव्हीची नुकतीच सुरुवात झाली आणि सोशल मिडिया हा प्रकारच नव्हता तेव्हा ही जाहिरात जनमानसात अशाप्रकारे रुजवायची म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाव्हतीच.

हळूहळू या जाहिरातींनी आपल्या संपूर्ण दिवसाचा ताबा घ्यायला सुरुवात केली. सकाळी उठून बेड टी कुठला घ्यायचा, पेस्ट,ब्रश कुठला वापरायचा, न्याहरीत पोहे उपमा फोडणीचा भात सोडून आता कुठले सिरियल घ्यायचे इथपासून ते दुपारचं जेवण,कपडे, संध्याकाळची छोटी भूक,पर्स,शूज,बाकी अॅक्सेसरीज कुठल्या कंपनीच्या वापरायच्या हे सुद्धा सांगायला सुरुवात केली. अमुक ब्रॅण्ड ची चादर,गादी,उशी, अमुक तमुक लाइट्स,पंखे, अगदी घरातलं फर्निचर सुद्धा ब्रॅण्डेड पाहिजे अशी मानसिकता तयार केली. तुम्ही सुट्टी कशी घालवायला हवी यांचेही सुंदर चित्र असं काही झोकात उभं केलं की तशी नाही सुट्टी घालवली तर चार लोकांत आपली काय औकात राहील असं वाटायला भाग पाडलं. तिथेही पुन्हा स्टार हॉटेल मधले, स्विमिंग पूलमधले फोटो, व्हिडिओ,रील्स यांनी तुमच्या सोशल भिंती गजबजलेल्या राहिल्या पाहिजेत तरच तुमचं जीवन एकदम हॅपनिंग वगैरे आहे असं वाटायला भाग पाडलं. मग हळूहळू तुमची लाईफस्टाईलच बदलून टाकली या जाहिरातींनी. आता त्या जाहिरातीतल्या सारखं आपण आपले कौटुंबिक आनंदाचे क्षण जगजाहीर करू लागलो. हे जिव्हाळ्याचे क्षण पब्लिक केल्यावर त्या लाईक, कमेंट्सच्या विळख्यात गुरफटून गेलो, त्यावर आपला आनंद अवलंबून ठेऊ लागलो..पण हे सगळं नकळत घडत गेलं. फारसा कोणी विचार नाही केला की माझ्या कुटुंबाचे वैयक्तिक फोटो, व्हिडिओ असे खुलेआम पोस्ट करत राहिलो तर त्यावर कुणाची बारीक नजर ही असू शकते. अर्थात हा विषय वेगळा आहे,पण त्यातले धोके खूपदा पुढे येऊन सुद्धा अजून लोकांना कळत नाहीत.

तर विषय असा की आज आपण आपलं शुद्ध, सात्विक जगणं फक्त फोटो पुरतं,व्हिडिओज पुरतं सिमीत करून टाकलं आहे. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट चित्रित व्हायला पाहिजे,ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायला पाहिजे असं वाटू लागलं. या वेड्या अट्टाहासापायी आपण आपल्यालाच जाहिरातीतले कॅरेक्टर बनवून टाकलंय. आपल्या छोट्या छोट्या मुलांचे तरी व्हिडिओ किंवा फोटो प्लीज नका सोशल मिडिया वर टाकू. हे माहितय का की आपल्या पोटच्या मुलांची सुद्धा संमती घ्यावी लागते फोटो अपलोड करताना,कारण ती एक सोशल ओळख बनते जी या आभासी पटलावरून कधीच पुसली जात नाही. भले ती आपण आपल्या भिंतीवरून डिलीट केली तरी. आपलं प्रेम, कौतुक दुसऱ्या तिसऱ्या अनोळखी लोकांपर्यंत पोहोचवून,त्यांची वाहवाही मिळवून असा काय फरक पडतो? आपल्या प्रेमाची जाहिरात मग ती कुठल्याही नात्याची असो ती लोकांसमोर का बरं कराविशी वाटते? शेवटी सगळेजण बेसिकली सेमच माणसं असतात, कशाला हे वेगळेपण सिद्ध करायचा खटाटोप?

जे लोक खरंच जगावेगळ काम करतात ना ते कधीच या दिखाऊ गिरी मधे पडत नाहीत. ते त्यांच्या मार्गानं चालत राहतात लोकांची पर्वा न करता. पण ही चमको लोकांची एक वेगळीच मानसिकता असते, खूप उतावळेपणा असतो जो हे करायला भाग पाडतो. पटकन प्रसिद्धी मिळते हे एक कारण असू शकतं. पण एक नाही हजार लोक तुमच्यावर नजर ठेवून असतात. हे मार्केटिंगचं तंत्रज्ञान इतकं म्हणजे इतकं तुमच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे की तुम्ही सध्या काय विचार करताय ते सुद्धा ओळखून त्या पद्धतीने आपल्यासमोर जाहिराती येत असतात, याचा आपण विचार केला पाहिजे. तुमच्या स्वतंत्र अस्तित्वावर,चालण्या बोलण्या वागण्यावर कुणा तिसर्याचा डोळा आहे किंवा खरंतर तो कुणीतरी तुम्हाला कंट्रोल करतोय हे आपल्या आकलनशक्तीच्या बाहेर आहे. पण निदान तुमच्या हातात काही गोष्टी तरी ठेवा , अगदी खास आपल्याच म्हणून. आपण काही फिल्म चे हिरो हिरोईन नाही की सगळं आयुष्य खुलेआम लोकांसमोर मांडावं. सोशल मिडिया हा आपण सामान्य लोकांचा पेज थ्री बनवून टाकलाय.

काही आनंद,व्यथा सांगायलाच हव्यात पण त्यासाठी आपली हाडाची खरीखुरी माणसं आहेत की , त्यांना जपूया. आणि खरच या जाहिरातींच्या भूलभुलैयातून बाहेर पडू या. बॅक टू बेसिक्स…अशी एक चळवळ आहे, खूप महत्वाची आहे ती.

हॅप्पी ख्रिसमस, हॅप्पी ईद कधी ऐकलंय का?

मग हॅप्पी दिवाली, हॅप्पी होळी, हॅप्पी दसरा कशासाठी अंगिकारायचं? सतत होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमारामुळच ना? ..चला तर या गोष्टी सोडून आता *शुभ दिवाळी* म्हणूया, आणि तोंड गोड करण्यासाठी कॅडबरीचं नाही तर लाडू बर्फींचं आयोजन करूया. काय म्हणता,पटलं ना?

असो, तुम्हाला सगळ्यांना दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा