शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलय – मंगेश तळवणेकर
उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
सावंतवाडी
शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेले आहे. त्यामुळे मेळाव्याद्वारे जनजागृती करणार असून पाऊस असो वा नसो, सर्व शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून 02 नोव्हेंबर 2024 रोजी आपापल्या वाहनांनी शेतकरी मेळाव्यासाठी सायंकाळी ठीक 6.00 वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेकडून केलं आहे.
ते म्हणाले, एक झाड तोडल्यास 50,000 दंड केल्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरीकांचे मोठे नुकसान झालेले आहे. छप्पर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्नकार्य, घरात जळावू लाकूड, विट्टी सारख्या व्यवसायांना लागणारे लाकूड, फनिर्चरसाठीचे लाकूड तोडणे कठीण झालेले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच सुतार, कामगार, टेम्पो मालक यांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात फॉरेस्ट लँड्स (वनजमीनी) मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच राज्याच्या तुलनेत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथे झाडांची वाढ सुद्धा 4 ते 5 वर्षात होते. शासनाच्या या मनमानी निर्णयाने सर्वच शेतकरी वर्ग, कामगार असे सर्वच उपासमारीने होरपळणार आहेत. शासनाने असा निर्णय घेताना आमच्या जिल्ह्याचा विचार का केला नाही? शासनाच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फटका सावंतवाडी मतदार संघातील शेतकऱ्यांना विशेषत: सासोली, वेळागर सारख्या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.