*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदाची यात्रा*
गावात मोठी यात्रा भरते
तपस्वी श्री घंटीबाबाची
श्रध्दा भक्ती चैतन्यासह
लयलूट असते आनंदाची…
प्रवचन किर्तन आध्यात्मिक
विविध होतात कार्यक्रम
दसरा ते दिवाळी काळ
पर्वणी सुटीची ह्रदयंगम…
आटोपता कामाची लगबग
मैत्रिणीसह यात्रेत खरेदी
हौस अनेक वस्तूंची जी
यात्रेतच मिळते अगदी…
रांगोळ्या ,साचे फुलदाण्या
घेतात लगेच लक्ष वेधून
इवल्याशा वस्तूचीही
हौस घ्यायची भागवून…
संध्याकाळी झगमगाट
लहान मुलांना पर्वणी
फुगे,विमान गाड्या,बाहुल्या
आकाश पाळणे,खेळणी…
पाहुण्यांसह भेळ पाणीपुरी
मजेत सगळ्यांसोबत
यात्रा उत्सवाने दिवाळीची
वाढते दरवर्षी रंगत….!!
¶¶¶¶¶~~~~~|¶¶¶¶¶
अरुणा दुद्दलवार दिग्रस@✍️