You are currently viewing कुडाळात महायुती आणि उबाठा कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची

कुडाळात महायुती आणि उबाठा कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची

कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाची उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या जिन्याच्या लगतच महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढत हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व कार्यकार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे आपले दालन सोडून खाली आल्या त्यांनी पोलीसांना सूचना दिल्या.कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या अर्ज सुनावणी वेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. ज्याची खोटी सही मारल्याचा आक्षेप होता.त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक तासाचा वेळा दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी संबंधित सूचक प्रांताधिकारी कार्यालयात जात असता युतीच्या एका कार्यकर्त्यांने त्याला आत जाण्यास विरोध करीत अडवीत धक्काबुक्की केली. यावेळी बाहेर थांबलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आत येत युतीच्या त्या कार्यकर्त्याला जाब विचारला. दरम्यान काही कार्यकर्ते त्या सूचकला घेऊन प्रांताधिकारी कार्यलयात गेले. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयांचा मुख्य दरवाजातच दोन्ही गट एकमेंकाना भिडले. त्यावेळी सुरुवातीला तिथे कोणी पोलीस सुद्धा उपस्थित नव्हते. काही वेळाने पोलीस आले. मोठा आरडाओरडा ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे देखील आपले चेंबर सोडून त्याठिकाणी तातडीने आल्या. दरम्यान पोलिसांनी सर्वाना बाहेर काढले. त्यानंतर मात्र तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुडाळमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांसह दीपक नारकर, योगेश घाडी यांनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा