*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वनहरिणी वृत्त*
*आली अंगणी दिवाळी*
सारे मिळुनी चला काढुया रंगबिरंगी ती रांगोळी
पापण्यांवरी घेउन स्वप्ने आज अंगणी सजे दिवाळी ||धृ||
आई बाबा काका काकी दादा वहिनी सर्वच आले
खेळ खेळता मुलांसारखे नकळत छोटे बच्चे झाले
रंग पाहुनी दिपावलीचे हसले तारे बघ आभाळी
पापण्यांवरी घेउन स्वप्ने आज अंगणी सजे दिवाळी ||१||
एका रांगेमधे लावले लाल गुलाबी आकाश दिवे
वीज तोरणे लुकलुकणारी जणू नभांगी चांदणं थवे
पणात्यांमध्ये जळती वाती तेजोमय ती ज्योत निराळी
पापण्यांवरी घेउन स्वप्ने आज अंगणी सजे दिवाळी ||२||
हिरवा पिवळा रंग जांभळा नवीन कपडे खुलून दिसले
ज्योतिर्मय या प्रकाशात मग आनंदाने सर्व नाचले
फुलबाज्या अन् भूचक्रांची धुंदीत सुरू झाली खेळी
पापण्यांवरी घेउन स्वप्ने आज अंगणी सजे दिवाळी ||३||
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६