You are currently viewing शांघाय येथील “जागतिक शहर दिन-२०२४” च्या परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र करणार भारताचे प्रतिनिधित्व

शांघाय येथील “जागतिक शहर दिन-२०२४” च्या परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्र करणार भारताचे प्रतिनिधित्व

*मुंबई – शांघाय सिस्टर सिटी रिलेशनशिपचा १०वा वर्धापन दिन साजरा होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र (वायसीसी) ही राज्याच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आहे. त्यामुळे शांघाय, चीन येथे आयोजित केलेल्या आगामी “जागतिक शहर दिन २०२४” जागतिक परिषदेत यशवंतराव चव्हाण केंद्राला सहभागी होण्यासाठी मुंबईतील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या वाणिज्य दूतावासाने आमंत्रित केले आहे.

३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शांघाय येथे होणाऱ्या “उत्तम जीवन शैलीसाठी लोक-केंद्रित शहरे तयार करणे” आणि शाश्वत शहरीकरणावर ज्ञानाची देवाणघेवाण, धोरण संवाद आणि सहयोग यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करेल, अशी या परिषदेची थीम आहे.

युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम (युएन-हॅबिटॅट) आणि चीनच्या गृहनिर्माण आणि शहरी-ग्रामीण विकास मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम मुंबई-शांघाय सिस्टर सिटी संबंधाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात १९ सप्टेंबर २०१४ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेनंतर मुंबई आणि शांघाय यांच्यातील सिस्टर-सिटी संबंध प्रस्थापित झाले.

युनायटेड नेशन्सने ऐतिहासिक घटना म्हणून ओळखली जाणारी ही परिषद शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि लोक-केंद्रित उपायांवर भर देऊन शहरी विकासातील आव्हाने आणि संधींचा स्वीकार करण्याच्या जागतिक बांधिलकीला अधोरेखित करते.

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण केंद्राचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी लोक केंद्रित शहरी उपक्रमांबद्दलची आमची बांधिलकी दर्शवते. यासाठी मी मुंबईतील चिनी वाणिज्य दूतावासाचे मनापासून आभार मानते,” असे सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “भारतातील सर्वसमावेशक शहरी जीवनशैली निर्माण करण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाशी संबंधित शाश्वत विकासावर विचारांची देवाणघेवाण करण्यास आणि आमचे कार्य अविरत पुढे नेण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच मुंबई-शांघाय सिस्टर सिटी संबंधांना चालना देण्यासाठी आम्ही आमच्या कामाचा विस्तार करण्यासही उत्सुक आहोत.”

“शाश्वत शहरी विकासासाठी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी सुधींद्र कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शांघाय येथे होणाऱ्या जागतिक परिषदेत चव्हाण केंद्र सहभागी होत आहे. भारत आणि चीन यांच्यातील मैत्री आणि सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा दीर्घकाळ सक्रिय सहभाग राहिला आहे,” असे गौरवोद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.

शांघाय येथे आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व म्हणून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यीय शिष्टमंडळ पाठविण्यात येत असून या शिष्टमंडळात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

सुप्रसिद्ध नगररचनाकार आणि पर्यावरणतज्ज्ञ गौतम कीर्तने; लेखक, जेष्ठ पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ श्रीराम पवार; प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे संस्थापक शिशिर जोशी; बारामती येथील एआयसी-एडीटीचे कृषी संशोधक डॉ. विवेक भोईटे; जेष्ठ नगररचनाकार ॲलन अब्राहम; नवभारत माध्यम समूहाचे जेष्ठ पत्रकार प्रशांत बारसिंग; आणि साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक निमेश वहाळकर यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

शिष्टमंडळातील बहुविद्याशाखीय तज्ज्ञ मंडळी जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शहरी नियोजक, धोरणकर्ते आणि विचारवंत नेते यांच्याशी सहकार्याचे मार्ग शोधतील आणि शाश्वत शहरी पद्धतींवरील अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करतील. शांघाय नंतर हे शिष्टमंडळ चीनच्या झेजियांग प्रांतातील हांगझोऊ आणि काही ग्रामीण भागांनाही भेट देणार आहेत.

विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी बळकट करण्याबरोबरच इतर राष्ट्रांच्या शहरी प्रशासन मॉडेल्समधून शिकण्यासाठी आणि भारताच्या स्वतःच्या शहरी लँडस्केपमध्ये सुधारणा करण्याचे यशवंतराव चव्हाण केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या देशात शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्राचा विविध स्तरावर सहभाग राहणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा