बोटीवर खून करून जाळलेल्या तांडेलाच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू
देवगड
अंतर्गत वादातून तांडेलचा खून करून त्याचे मुंडके छाटून मच्छीमारी नौकेला आग लावण्यात आली. ही पेटवलेली नौका देवगड बंदरात आणून तपास सुरू झाला आहे. नौका पेटवल्यामुळे तांडेलाचा मृतदेह पूर्णतः जळून गेला असून, त्याचे अवशेष शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा आज प्रयत्न करत आहे. यासाठी नौकेत असलेले पाणी काढून टाकून तपास यंत्रणा पाहणी करत आहे. काल रात्री नौका देवगड बंदरात आणण्यात आली आणि मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा, राहणार छत्तीसगड, यांनी तांडेलाचा खून करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अधिक तपशील असा की, रत्नागिरीतील राजीवडा भागातील नुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची “मुजत राबिया” नावाची नौका रविवारी दुपारी साधारण दीड वाजता मिरकर वाड्याहून मासेमारीसाठी निघाली होती. मासेमारीदरम्यान, कुणकेश्वरजवळ खोल समुद्रात खलाशी आणि तांडेल यांच्यात वाद विकोपाला गेला. खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर, राहणार गुहागर, यांचा खून करून नौकेला आग लावली.
आग लागल्याचे लक्षात येताच जवळच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. नौकेवरील खलाशांना वाचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला. याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस दलास माहिती दिली. सागर पोलीस दलाच्या गस्तीनौकेने त्वरित घटनास्थळी पोहोचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि देवगड बंदरात आणले.
यावेळी देवगड बंदरातून “म्हाळसा मल्हार” नावाची नौका घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. स्थानिक मच्छीमार आणि सागर सुरक्षा दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. सर्व खलाशांना देवगड बंदरात “मिनाक्षी” नावाच्या नौकेवरून सुरक्षित आणण्यात आले.