कुडाळ मधून अजून एक वैभव नाईक रिंगणात…
कुडाळ :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अजून एका वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैभव जयराम नाईक असे या उमेदवाराचे नाव असून ते चैतन्यनगर, पवई-मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांचा अर्ज सागर सोलकर यांनी खरेदी केल्याची नोंद असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केला आहे. आज कुडाळ तहसील कार्यालय परिसरात याच नामसाधर्म्यची चर्चा होती.
दोन वैभव नाईकांप्रमाणे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन विनायक राऊतांची चर्चा होती. त्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक भाऊ राऊत यांच्यासह विनायक लवू राऊत या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या पाठोपाठ त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले होते. त्यांना त्या निवडणुकीत 15 हजार 826 मत मिळाली होती आणि ही टक्केवारी एकूण मतदानाच्या 1.73% एवढी होती.
यावेळी देखील वैभव नाईक यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या या मुंबईच्या वैभव नाईक यांच्या उमेदवारी अर्ज दाखलमुळे नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार हे 23 नोव्हेम्बरलाच कळणार आहे.