You are currently viewing ‘कर्जाच्या तप्त उन्हात’

‘कर्जाच्या तप्त उन्हात’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजेच सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित एका शेतकऱ्याच्या आयुष्याची संवेदनशील कविता*

 

*’कर्जाच्या तप्त उन्हात’*

 

**************

बापाच्या चेहऱ्यावर

कर्जाच जाळं पहून

माय माझी रोज रडायची

मला पाहिल्यावर

कोपऱ्यात जाऊन

अश्रु पुसून घ्यायची

या अश्रूंच पांग कधी फिटेल

याचा मी विचार करायचो

पाणी पिऊन जगाणाऱ्या बापाला

रोज मरताना बघायचो

 

सुकलेल्या मातीत

घाम कष्टाचा गाळूनही

मातीत अंकुर फूटायचा नाही

कर्जाने पोकळ झालेल्या

बापाची

त्या देवाला दया यायची नाही

तरीही बाप माझा रोज

शेतात राब राब राबायचा

भुक मारून आश्रु गिळून घ्यायचा

 

उन्हाततान्हात

अनवाणी चालत

माय माझी शेतात यायची

कर्जाच्या तप्त उन्हात

आभाळाकडे बघणाऱ्या बापाच्या कपाळावरचा घाम पुसायची

बाप माझा रडायचा

माय डोळे पुसायची

सुकलेली भाकर आणि

कोरडी चटणी खायला द्यायची

बाप माझा त्या भाकरीचे

तिन तुकडे करायचा

एक मायलान् एक मला

खायला द्यायचा

एक सोता खाऊन

मायचीन् माझी काळजी घ्यायचा

 

गोष्टीत वाचल होतं

देवबा लहान मुलांच ऐकतो म्हणून

मी देवाला रोज विनंती करायचो

एकदातरी पाऊस पाड म्हणून सांगायचो

एकदा देवाने ऐकलं

शेतात भरपूर पिकलं

कर्ज फिटण्याच्या आनंदात

बाप माझा नाचायला लागला

देवबा ढगातून बघायला लागला

 

पण…

त्या देवाला माझ्या बापाचं सुख पहावलं गेल नाही

एक दिवस पाऊस अचानक अवकाळी आला

आन बाप माझा

शेतातल्या झाडाला लटकला

 

त्याच झाडाच्या सावली खाली बसुन

मी आभाळात गेलेल्या

बापाशी बोलायचो

एकदातरी पाऊस पाड म्हणून

देवाला सांगायला लावायचो

बाप माझ्या स्वप्नात येवून मला सांगायचा

देवबा आता बहिरा झाला आहे

तो कुणाचच ऐकत नाही

माझ्याशी तर तो बोलतचं नाही

त्यानंतर मी देवाला कधीच

विनंती केली नाही

मायच्या अश्रुंच पांग

कधी फिटलचं नाही

 

ज्या झाडाला लटकून

बाप माझा मरून गेला

ते झाडही आता

बापाच्या आठवणीत

रोज मरतय

कोरड्या मातीकडे पाहून

कर्ज कस फिटेलं

याच चिंतेत मी जगतोय

याच चिंतेत मी जगतोय

 

*संजय धनगव्हाळ*

9422892618

प्रतिक्रिया व्यक्त करा