You are currently viewing सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्यावी

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्यावी

*सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्यावी.

वैभववाडी

सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
झकपक ऑफर आणि सूट-सवलतींमुळे अनियंत्रित खरेदीला चालना मिळू शकते. पटकन या ऑफर्स मिळविण्याच्या नादात अनेकदा तुमच्याकडून प्लॅटफॉर्मच्या वैधतेकडे
दुर्लक्ष होऊ शकते. अनोळखी विक्रेते आणि अविश्वासार्ह व्यवसायांबद्दल पुरेशी माहिती गोळा करण्याची खात्री करा. ऑफर्ससाठी साईन अप करताना, आवश्यक नसलेली जास्त वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करू नका. कारण यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो. खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कसारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर करू नका. त्यामुळे तुमची आर्थिक माहिती हॅकर्सना खुली होऊ शकते.
सणांच्या काळात खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, आपण नक्की काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवणे ग्राहकांकडून चुकू शकते. त्यातून ते फिशिंग स्कॅम्सला बळी पडू शकतात. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी दोनदा तपासून पाहा. तुमच्या खात्यांसाठी साधा किंवा पूर्वनिर्धारित डिफॉल्ट पासवर्ड वापरणे टाळा. यामुळे हॅकर्ससाठी तुम्ही सोपे लक्ष्य बनता. प्रत्येक खात्यासाठी मजबूत आणि वेगळा विशिष्ट पासवर्ड तयार करून सुरक्षा वाढवा. आँनलाईन खरेदी करताना वरील प्रमाणे काळजी घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. तरीही फसवणूक झाल्यास पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा