*🚩सफर सावंतवाडी कोटाची 🚩*
गावापासून सावंतवाडी जवळ असल्याने नेहमी सावंतवाडीला जाणं होतं. परंतु सावंतवाडीतील सावंतवाडी कोटाला कधी भेट देणे झालंच नाही 😁 त्यासाठी आज २६ ऑक्टोबर २०२४ चा दिवस उजाडला.
आज इलेक्शन ट्रेनिंग सावंतवाडीला होतं त्यामुळे आदल्या दिवशीच ठरवलेले सावंतवाडी कोटाला भेट द्यायचीच, त्यासाठी माझे मित्र सुनिल करडे सर यांना तयार केलं आणि आम्ही सायंकाळी ३.३० वाजता सावंतवाडी कोटात पोहचलो.
सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी नावाप्रमाणे खूपच सुंदर आहे. सावंतवाडी म्हटलं की आपल्या समोर येतो तो मोती तलाव. या तलावाच्या पूर्वेस राजवाडा म्हणजेच सावंतवाडी कोट. पूर्वी या कोटातच हा तलाव होता. तलावाच्या उत्तरेस साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर कोलगाव दरवाजा आहे. या तलावाच्या पश्चिमेस जुना कोट होता. आता असलेल्या राजवाड्याला नवा कोट म्हणून ओळखले जाते. या दोन्ही कोटांना जोडणारी तटबंदी होती असे म्हणतात. सदयस्थितीत जुना कोट अस्तित्वात नाही. सावंतवाडी किल्ला पूर्वी नरेंद्र डोंगरावर होता त्याचेही अवशेष सध्या दिसत नाहीत. नंतरच्या काळात हा कोट बांधला गेला.
रस्ताला लागून असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण कोटात प्रवेश करतो. डाव्या बाजूला एक खोली दिसते. सद्या तिथे पतसंस्थेचे कार्यालय आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला नारळांची झाडे लावलेली दिसतात. लगेचच आपल्याला दुमजली राजवाडा लागतो. उजव्या बाजूस असलेल्या कार्यालयातून ३० रुपयांचे तिकीट काढून आम्ही राजवाडा पाहण्यासाठी निघालो. राजवाड्याच्या भव्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या आहेत. राजवाड्याचे बांधकाम जांभा दगडाचे आहे परंतु पायऱ्या ह्या दगडी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला संग्रहालय आहे. यामध्ये संस्थांनाच्या वंशावळीचे फोटो, संस्थांनाचा इतिहास, संस्थांनातील व्यक्तींचे फोटो, त्यांनी काढलेली चित्रे, घराण्याच्या वस्तू, विविध देवतांच्या मुर्त्या, शिसमचा बनवलेला सुंदर देव्हारा, पाळणा, न्यायनिवाडा करणारतानाची खुर्ची, आंबोली घाटाचा रस्ता इंग्रजांना सांगणाऱ्या धनगराचा पुतळा, लाकडात कोरलेल्या वस्तू, तांब्या पितळेच्या तसेच इतर अनेक वस्तू व कलाकुसरी आपल्याला पहावयास मिळतात.
वरच्यामजल्यावर पालखी, गणपतीच्या मूर्तीचा देव्हारा, मुर्त्या, गंजिफाचे फोटो व इतर फोटो, जुनी भांडी व मुर्त्या पहावयास मिळतात. त्यानंतर खाली उतरलो. या भागांची माहिती व इतिहास आपल्या शैलीत सांगणारे एक काका आहेत, ते आपल्याला सर्व माहिती सांगतात.
बाहेर पडून उजव्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये सिंहासन, वाघ व बिबट्या, तलवारी, काचेचे झुंबर, इतर नक्षीकाम आपल्याला दिसते. बाजूलाच हाताने कारागीर गंजिफा, हॅन्डमेड पत्ते व इतर खेळांचे साहित्य बनवत होते. त्यांची कलाकुसर बघून खूप अचंबित व्हायला होतं. उजव्या बाजूला राजघराण्याचा राहण्याचा वाडा आहे. राजवाड्याची डागडुजी सुरु असल्याने बाकी काही पाहता आले नाही.
दरवेळी भ्रमंती केलेल्या किल्ला / कोटाचा इतिहास थोडक्यात लिहीत असतो परंतु सावंतवाडी कोटाचा इतिहास लिहिणे म्हणजे संपूर्ण सावंत संस्थानचा इतिहास लिहावा लागेल परंतु तो थोडक्यात लिहिणे काही शक्य वाटतं नाही आणि तो जरा मला क्लिष्टही वाटला 🙆🏻♂️ त्यामुळे इतर संदर्भ साहित्यामध्ये आपण तो वाचवा.
मी एवढ्यावर्षात सावंतवाडी कोट बघितला नव्हता एवढेच काय गेली १५ वर्षाहून सावंतवाडीत राहत असलेले माझे मित्र करडे सरांनीसुद्धा माझ्याबरोबर एवढा कोट पहिल्यांदाच बघितला तुम्हीही आमच्यासारखेच हा कोट पहिले नसलेले आहात का? असाल तर कोकणातील ज्या संस्थांनाचे छोटे आरमार होते अशा सावंतवाडी संस्थानचा हा कोट आपणनक्की पहावा 😊
पुन्हा भेटू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका नवीन किल्ल्याची सफर घेऊन 😊 जय शिवराय 🚩
*गणेश नाईक*
📱९८६०२५२८२५