You are currently viewing ऑन काॅल दूर्मिळ रक्तदात्याचे मध्यरात्री रक्तदान

ऑन काॅल दूर्मिळ रक्तदात्याचे मध्यरात्री रक्तदान

ऑन काॅल दूर्मिळ रक्तदात्याचे मध्यरात्री रक्तदान

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदान करून महिलेचे वाचविले प्राण

सावंतवाडी

मोडेमाड येथील महिलेच्या अवघड शस्त्रक्रियेसाठी बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे मध्यरात्री जाऊन रक्तदान करून उभा दांडा वेंगुर्ला येथील जय मांजरेकर या रक्तदात्याने त्या महिलेचे प्राण वाचविले. जय मांजरेकर हा ऑन कॉल रक्तदाता असून या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्याचे संघटनेकडून तसेच रुग्ण महिलेच्या नातेवाईकांकडून आभार मानण्यात आले.

अचानक उद्भवलेल्या गुंतागुंतीतून मोचेमाड येथील समिक्षा चांदेकर या रुग्ण महिलेची अवघड शस्त्रक्रिया शुक्रवारी डाॅ. विशाखा पाटील हाॅस्पिटल, कुडाळ येथे पार पडली. पेशंटचा रक्तगट बी निगेटीव्ह असा दूर्मिळ असल्याने आणि सकाळीच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने रक्ताची तातडीची गरज होती. दूर्मिळ रक्तगट असल्याने रात्रीच्यावेळी रक्तदाता मिळणे सहजशक्य नव्हते.

दरम्यान, दूर्मिळ रक्तगटाचे नवतरुण ऑन काॅल रक्तदाते जय मांजरेकर यांनी ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ यांच्या माध्यमातून साखळी, गोव्यातील श्याम नाईक नामक एका पेशंटसाठी सिंगल डोनर प्लेटलेट्स डोनेशन केले होते, ती पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यामार्फतच पेशंटचे यजमान संतोष चांदेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा जय मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता जय मांजरेकर यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या साईराज गिरप (उभादांडा) या मित्रासमवेत रात्री पावणेबारा वाजता जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे जाऊन अनमोल असे रक्तदान केले व रक्तदान करुन रात्री अडीच-पावणेतीन वाजता सुरक्षित घरी पोहोचले.

केवळ बावीस वर्षीय जय मांजरेकरचे हे तब्बल सोळावे रक्तदान होते तर वर उल्लेख केल्याप्रमाणे एकदा त्यांनी अत्यंत कठीण असे सुद्धा केलेले आहे. जयच्या या दैवी कर्तृत्वाला आणि धिरोदात्त समयसूचकतेला आम्हा सर्वांचाच मानाचा मुजरा आणि त्याला घेऊन जाणार्‍या धाडसी साईराज गिरप या युवकाचेही आभार मानले. तसेच असे अनेक कार्यतत्पर रक्तदाते संघटीत करणार्‍या बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ यांचेही आभार मानले. तर रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी तर गहिवरल्या अंतःकरणाने रक्तदात्यासहीत संस्थेचेही आभार मानले.
अशा अनेक गुंतागुंतीच्या पेशंटसाठी तसेच बायपास शस्त्रक्रियेच्या पेशंटसाठी रक्तदाते पाठवून पेशंटचा बहुमोल जीव वाचविणे हे आता ” ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” साठी नित्याचेच झाले आहे. केवळ रक्तदात्यांच्या जीवावरच ही संस्था रुग्णांचे बहुमोल जीवन सुखकर करीत आहे. या रक्तदात्यांच्या आम्ही सर्वचजण कायमच ऋणात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा