You are currently viewing फायद्याचा सौदा

फायद्याचा सौदा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री गझलकारा अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*फायद्याचा सौदा*

 

बर्‍याच वेळा असं वाटतं की जीवनाच्या या महान रंगमंचावर आपली पदार्पणाची वेळ बरीच चुकली. जेव्हा तिथे खरे खुरे हरहुन्नरी कलाकार होते तीच ती वेळ होती. फक्त त्यांची पायधूळ जरी घेता आली असती तरी बस झाले असते. व.पु. त्यातलेच एक महान कलाकार. अत्यंत आवडीचे. ते जे लिहितात ते सरळ सरळ आपल्या पदरात पडतं. खूप मोठे देखावे, नयनरम्य वर्णनं, पात्रांची उतरंड, साहित्य सौंदर्याने नटलेली भाषा वगैरे काही नसतं त्यात. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं, त्यांचं सामान्य जीवन, त्यातलेच साधे प्रश्न आणि त्या साध्या प्रश्नांच्या गुंत्यांचं मनोवेधक विश्लेषण. नात्यांना, नात्यांमधील भाव बंधनांना अतिशय सूक्ष्मपणे हाताळून अलगद त्यातली गंमत आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचं कसब ; सटीक आणि सडेतोड. झटक्यात पटेल असंच.

वपुंचं कुठलेही पुस्तक हातात पडूदे, ते वाचून संपवल्याशिवाय तुमच्या मनाला चैन पडणार नाही एवढी त्यांच्या लिखाणाची ताकद अफाट आहे- हे मी वेगळं काय सांगू?

 

असच एक व.पु. पॅटर्न पुस्तक; ‘वलय’.

बऱ्याच आधी म्हणजे कॉलेजमध्ये असताना वाचलं होतं पण पुन्हा वाचताना त्याचे नवीन संदर्भ उलगडत गेले आणि वलयचं गारुड कधी झालं कळलंच नाही. काही निवडक वपुंचे कोट्स मी त्यावेळीही डायरीत टिपून ठेवत असे…. तुमच्यासाठी हे वलय मधले काही कोट्स;

 

## अभावितपणे गुंतण्याचा हा असाच एखादा क्षण असतो जो उगवताना पूर्वसूचना न देता उगवतो आणि आपण तो पारखून घेईघेईतो मावळलेला असतो.

 

##. स्वतःतच आपली किती तरी स्वतःची अनोळखी रूप वावरत असतात.

 

##. पुरुषाला पत्नी हवेच असते पण त्याहीपेक्षा त्याचं मन प्रेयसीसाठी भुकेलेलं असतं. पत्नी ज्यावेळी प्रेयसी बनून त्याच्याकडे येते त्यावेळी त्याला प्रियकर बनवण्याचा सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं; त्यावेळी एकच जाणवतं सगळं खोटं आहे- सुशिक्षित पणा, सुसंस्कृतपणा, मोठेपणाचे झूल, शेवटी नर- मादी हेच खरं नातं. तेच घरटं, ते भेदून पलीकडे जाण्याची ताकद कुणातच नाही.

 

##. आकर्षणाचं अंतिम ध्येय मिलन हेच असेल तर मिलनाची पुढची पायरी विरहाची! विरक्तीचीच!!

 

##. कुठेही काहीही कमी नसताना माणसं दुःखी दिसतात ती याच मुळे, अत्युत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना मिळतच नाही.

 

किती किती खरं आहे ना हे विधान. माणूस मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसा मागून घेईल, नड भागवेल आयुष्यात पुढे सरकेल ही पण तरीही तो पूर्णतः सुखी होईल का? आपलेपणा जपणार, आपली काळजी घेणार एक जवळच हक्काच माणूस आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर आपल्याला हवंच असतं. पण हेही खरंच ना ,

असली कीमत तो दोही बार समझ आती है

एक उसे पाने से पहले और दुसरा उसे खोने के बाद!

 

आपलं म्हणावं असं एक तरी माणूस असतच आपल्याजवळ पण अति सहवास किंवा अतिपरिचयात अवज्ञा असं काहीस होऊन जातं. आपण रोज उठून तर आपल्या प्रेमाच प्रदर्शन म्हणा किंवा प्रचिती दुसऱ्या माणसाला देऊ शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपलं त्याच्यावर प्रेमच नसतं. हा पण अधून मधून हे सांगणं ही खूप गरजेचे आहे की खरंच मी हे सगळं करते आहे हे रोजच्या सवयीन किंवा यंत्रवत नाही करत, त्याला मूळ कारण त्याची मूळ प्रेरणा हे माझं तुझ्यावरच असलेलं प्रेमच आहे. आणि हे कुठेतरी पटवून देण्याची गरज असतेच किंबहुना आहेच.जर आहेच प्रेम तुमचं तर का पटवून द्यायचं नाही? थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात घालवणं, आवडीनिवडी तर आपण जपतच असतो पण कधीतरी एखादा सरप्राईज गिफ्ट देऊन ते प्रेम व्यक्त करणं, एखादी डिनर डेट प्लॅन करणं किंवा एखाद्या निवांत संध्याकाळी फक्त दोघांसाठी कॉफी ब्रेक घेणं ही काही फार मोठी खर्चिक गोष्ट नक्कीच नाही. आता पहिल्यासारखे मोठ मोठे वाडे राहिले नाहीत अर्थात एकत्र कुटुंब पद्धती ही राहिली नाही. पण तरीही मुलं मोठी झाल्यावर

नवरा बायकोला एकमेकांसोबत त्यांचा असा स्वतःचा वेळ मिळत नाही. खूप गोष्टी बोलायच्या असतात, शेअर करायच्या असतात त्या राहून जातात. म्हणूनच वर्षातून दोन-तीन वेळा तरी का होईना दोन दिवस फक्त दोघांनीच कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येणं फार अवघड आहे का? आपल्या अनुपस्थितीत घरातले इतर लोक किंवा मुलं सुद्धा स्वतःच्या गोष्टी स्वतः मॅनेज करायला शिकतात आणि त्या त्यांनी शिकल्याच पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याही आयुष्यात आपल्याला आनंदी राहण्याचा, आयुष्य पूर्णपणे जगण्याचा आपला हक्क आपण स्वतःलाच देऊ केला पाहिजे. यासाठी फार मोठ्या पैशांची ही गरज असतेच असं नाही. गरज असते ती फक्त इच्छेची आणि आपलं प्रिय माणूस जपायला हवं या जाणिवेची. कारण शेवटी मुलंही मोठे झाल्यावर आपापल्या वाटेने पुढे जाणारच असतात. मागे राहणार असतात ते फक्त नवरा बायको. त्यांच्यापैकी सुद्धा एक जण आधी निघून जाईल दुसरा एकटा पडेल. मग त्याची किंमत नंतर कळण्यापेक्षा जितके दिवस हातात आहेत तेवढे दिवस एकमेकांची सुखदुःख पूर्णार्थानं वाटून घेण्यात खरं सुख आहे. मला कोणी समजून घेत नाही, माझं मन मोकळं करायला कोणी जिवाभावाचा सोबती नाही हे रडगाणं गात बसण्यापेक्षा आपल्या आयुष्यभराचा जो साथीदार आहे त्यालाच आपण आपल्या मित्र कसा बनवू शकतो याचा विचार करायला हवा. अगदी काहीच जमलं नाही तरी निदान एखादा छंद तरी दोघांनी एकत्र मिळून जर का जोपासला तरी त्यातून सुद्धा आपण खूप आनंद मिळवू शकतो. जसं की सकाळचा किंवा संध्याकाळचा एकत्र फिरायला जाण्याचा उपक्रम. तो एक तासभर सुद्धा आपल्याला खूप नवीन ऊर्जा देऊन जातो. एखाद्या वाचलेल्या सुंदर पुस्तकावर चर्चा करणे, अर्थात दोघांना आवड असेल तर, ही गोष्ट सहज शक्य होऊ शकते. दोघेजण मिळून छान छान रोप लावून बाग कामात आपला वेळ घालवू शकतात. असे खूप काही सृजनात्मक छंद आहेत जे तुम्ही आपल्या साथीदाराबरोबर जोपासून नक्कीच आपल्या जीवनाला पुन्हा एक छान तरतरी देऊ शकता.

शेवटी काय जसं वपू म्हणतात की काहीही कमी नसताना माणसं दुःखी कष्टी झालेली दिसतात कारण त्यांना अत्युत्कट प्रेम करणारी व्यक्तीच मिळत नाही… तर मग मला वाटतं आपणच का ती व्यक्ती बनू नये? आपणच का उत्कटपणे दुसऱ्यावर प्रेम करू नये? त्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तोही काही कमी असतो का? स्वतःच्या आनंदाची तेवढी किंमत म्हणजे फार फायद्याचा सौदा…तुम्हाला काय वाटतं?

 

©®अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा