*प्रबळ दावेदार होतो; बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वगृही परतलो*
*दीपक केसरकर यांच्या प्रचार कार्यात आघाडीवर असेन; पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून देणार..*
*शिवसेना प्रवेशानंतर संजू परब यांचा पत्रकारांशी संवाद*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत हातात हात घालून काम करणार आहे. खरं म्हणजे मी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार होतो. अपक्ष लढविणार म्हणूनही जाहीर केले होते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वगृही परतलो. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांना ५० हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारकार्यात आघाडीवर असेन, असा विश्वास माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी येथे व्यक्त केला.
माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्या नंतर संजू परब यांनी गुरुवारी येथील हॉटेल शिल्पग्राम येथे पत्रकारांशी संवाद साधला.
दीपक केसरकर आणि आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीत टीका करावी लागते. शिवसेनेत प्रवेश केल्यावर सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षामुळे नगराध्यक्ष बनण्याची संधी मिळाली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नेहमीच सहकार्य केले. भाजपा शिवसेना युती आहे, त्यामुळे युतीचा धर्म पाळताना भाजपा नेत्यांशीही सलोख्याचे संबंध कायम राहणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार आहोत.