“विश्वस्त”
( बोधकथा, फक्त मतदारांसाठी)
राजाला शंका आली. तिजोरीतील खजिन्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्याने बिरबलाला तातडीने पाचारण केले. आपल्याला राजाने पहाटे गाढ झोपेत असताना का बर पाचारण केले? बिरबल ताबडतोब राजाच्या दरबारात गेला. राजा चिंतातूर होता. बिरबल म्हणाला, “महाराज, आपण आज खूपच चिंतेत दिसता, काय बरं कारण असावे? राजा म्हणाला, ” होय बिरबला, कारण तस गंभीरच आहे. ज्या आपल्या खजिन्याच्या चाव्या आणि जबाबदारी ज्या विश्वासाने ज्या विश्वस्ताकडे दिली आहे त्यात फार मोठी गडबड आहे.. सारा खजिना त्याने आपल्या सग्या सोयऱ्यासा़ठीच वापरत आहे. हा रयतेचा पैसा आहे. त्याचा विनियोग जनकल्याणासाठीच व्हायला पाहिजे. यावर आपल्याला तातडीने उपाययोजना केली पाहिजे “.बिरबलाने राजाला आश्वस्त केले आणि बिरबल कामाला लागला. त्याने नव्या विश्वस्तासाठी अर्ज मागवले. अनेकांनी अर्ज केले पण मुलाखती मध्ये फक्त तीनचं अर्ज वैध ठरले. बिरबलाच्या युक्तीनुसार तिंघाचीही परिक्षा घ्यायची ठरली.
साधारणपणे एक कि. मी. अंतरावर तीन वस्तू ठेवल्या. एक सोन्याचा गोळा, दुसरा चांदिचा गोळा व तिसरं पिंपळाचं झाडं.. आणि या तिघांनीही पळत जाऊन त्यापैकी आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. त्या तिघांपैकी दोघेजण धापा टाकत जोरात धावू लागले, मात्र तिसरा होता तो अगदी सावकाश चालू लागला. त्या दोघांपैकी एकजण लवकर पोहचला आणि तो सोन्याचा गोळा घेऊन छातीला कवटाळला. दुसरा थोडा उशिराने पोचला त्यांनी तो चांदिचा गोळा घेतला. आपण जरा ताकदीने धावलो असतो तर तो सोन्याचा गोळा मिळाला असता हे दु:ख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत. विशेष उभारलेल्या शामियान्यात बसून राजा व बिरबल याचे निरीक्षण करत होते. मग हा तिसरा इच्छुक होता तो त्या ठिकाणी पोहचला व त्याने त्या पिंपळाच्या झाडाचे रोपटे घेतले व आनंदाने नाचू लागला. हे पाहून राजा चकित झाला. त्याला बिरबलाने प्रश्र्न विचारला, तू त्या दोघांपेक्षा पळण्यात चपळ असूनही अगदी सावकाश का आलास? तो तिसरा स्पर्धक म्हणाला, मला माहीत होत, की सोन्याच्या व चांदीच्या गोळ्यासाठी हे पळणार आणि ते पिंपळाचं रोपटं तिथचं शिल्लक रहाणार. मला ते रोपटचं हवं होत. जेणेकरून ते मी लावलं व त्याचा भविष्यात मोठा वटवृक्ष झाला तर जनतेला सावली मिळेल आणि आॅक्सीजनही”.. हे विचार ऐकून राजा प्रभावित झाला. त्याने आपल्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्या तिसऱ्या पि़पळाचं रोपट घेऊन नाचणाऱ्याकडे दिल्या.. आणि राजा म्हणाला, आजपासून या राज्याच्या तिजोरीचा तू खरा विश्वस्त..
( मतदारानो,आता तुम्ही ठरवा आपण कुणाला विश्वस्त म्हणून निवडायचं ते)
…. शब्दांकन- अॅड. नकुल पार्सेकर..