सिंधुदुर्ग :
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या आपल्या ५ गुंठे जमिनीचा मोबदला कुडाळ प्रांत कार्यालयाने भवलत्याच व्यक्तीला दिला आहे. या प्रशासकीय कार्यपद्धतिच्या विरोधात कुडाळ लक्ष्मी वाडी येथील स्मिता चंद्रकांत राऊळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
कुडाळ तालुक्यातील सांगिर्ड येथील सर्व्हे नंबर ८ हिस्सा नंबर ३/१ मधील ५ गुंठे क्षेत्र आपले पती चंद्रकांत राऊळ यांच्या अखत्यारीत व वहिवाटी त आहे. न्यायालयाने हा हक्क मान्य केला आहे. भूमी अभिलेख कुडाळ कार्यालयाने ही वहिवाट नकाशावर दाखविली आहे. दरम्यान भूसंपादन प्रक्रिया पार पाडताना वहिवाट दाखविण्याच्या सूचना भूमी अभिलेख उपअधीक्षक कुडाळ यांनी मोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेस दिल्या होत्या मात्र पतीची वहिवाट न दाखविता भलत्याच इसमाला सक्षम प्राधिकारी कुडाळ यांनी नुकसान भरपाई ची नोटीस दिल्याचा आरोप स्मिता राऊळ यांनी केला आहे.
संबंधितांवर न्यायालयाचा अवमान केला असून राष्ट्रीय महामार्ग विभाग बळजबरीने ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भूमी अभिलेख विभागाने अतिरिक्त भू अधिग्रहण क्षेत्र निश्चित केले असून माझ्या पतीच्या मालकीचे क्षेत्रातील आणखीन काही क्षेत्राची आवश्यकता असल्याचे आपल्याला सक्षम प्राधिकारी कुडाळ यांच्याकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी पतीचा मालकी हक्क नाकारणाऱ्या भूमी अभिलेख विभागाने आणेवारी पद्धतीत मात्र पतीचे नाव नमूद केले आहे. ही बाब दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.