You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*(४०) माझे गाव कापडणे….*

 

मंडळी, उत्सुकता वाढली आहे ना? अहो,

आपण नुसते वाचतो आहोत तरी किती थरारक

वाटते आहे. विचार करा घरादारावर निखारा

ठेवून अवघ्या पंचविशीतील ही तरूण मुले जेव्हा राष्ट्रकार्यात सामील झाली तेव्हा यांच्या

घरच्यांचा जीव किती टांगणीला लागला असेल. पण हे तरूण झपाटलेले होते हे साऱ्यांना माहित होते.विष्णुभाऊच साऱ्या मोहिमेची आखणी जीव धोक्यात घालून रात्रीबेरात्री फिरत संघटन करत कामे नेमून देत असत. कार्य पणाला लावत असत.

 

मार्च १९४४ च्या दुसऱ्या आठवड्यात वरील

कार्यक्रमासाठी साताऱ्याहून १६ तरूण मंडळी

रिव्हॅाल्वरसहित आली.त्या सर्वांचा मुक्काम

वरपाडे(बोरकुंड) येथे पिंजारी यांच्या मळ्यात

होता. पंधरा दिवसा नंतर १६ पैकी चार तरूण

कुंडल येथे परत गेले.या कार्यक्रमात साताऱ्याकडील १२ मंडळी व श्री.विष्णू सीताराम पाटील, कापडणे,डॅा.उत्तमराव पाटील, श्री.व्यंकटराव धोबी आणि श्री.शंकर पांडू माळी ,शिरपूर एवढी १६ मंडळी

सामिल होती.

 

बोरकुंडच्या वरपाडे जंगलात( मंडळी ४४साल

डोळ्यांसमोर आणा. केवढे जंगल असेल त्यावेळी अन् अशा जंगलात जीवावर उदार

होऊन ही मंडळी रहात होती).या सर्वांचा मुक्काम असतांना त्यांना श्री. ओंकार बापू पाटील,बोरकुंड हे जेवण पुरवित होते.आपापल्या परीने मिळेल ती भूमिका

प्रत्येक जण करत होता.अधून मधून श्री.

दयाराम पाटील आणि श्री.भाऊराव पाटील

हे या ठिकाणी येऊन क्रांतिकारकांना माहिती

पुरवित होते.(भयंकर उन्हाळ्यात).

 

आणि एकेदिवशी क्रांतिकारकांना माहिती

मिळाली की,उद्या म्हणजे १४एप्रिल १९४४

रोजी साडेपाच लाख रूपयांचा सरकारी

खजिना नंदुरबार येथे धान्य खरेदीसाठी जाणार आहे. तेंव्हा क्रांतिकारकांना हुरूप आला.लक्ष्य डोळ्यांसमोर दिसू लागले.

श्री. विष्णू सिताराम पाटील हे क्रांतिकारकांना

चिमठाणे येथे पोहोचविण्यासाठी लागणारे टांगे किंवा बैलगाडी यांची जुळवाजुळव करण्यासाठी श्री.गोविंदराव,तळोदे ता. चाळीसगांव येथे गेले.पण इकडे श्रीरामचंद्रबाबा मोहाडीकर यांनी

एक टांगा व एक बैलगाडी क्रांतिकारकांना दिल्याने १५ क्रांतिकारक रात्रीच्या वेळी

चिमठाण्याकडे निघाले.पांझरा नदी ओलांडतांना व्हिक्टोरिया पुलावर पोलिसांनी क्रांतिकारकांच्या गाड्या अडवल्या….तेंव्हा

क्रांतिकारक आणि पोलिस यांच्यात थोडा वेळ

संघर्ष झाला….

 

(आप्पांकडे रिव्हॅाल्व्हरचा परवाना होता.

खूप वर्षे ते आमच्या घरी होते. सोबत गोळ्याही होत्या. आप्पा अधून मधून त्याची साफसफाई करत असत . आम्ही लांबून कुतूहलाने सारे बघत असू). चला उत्सुकता वाढली आहे तर …ऐका मग….

 

चकमक झाली….क्रांतिकारकांनी पोलिसांना

नदीत फेकून द्यायची धमकीच दिली. तेव्हा कुठे

पोलिस मागे हटले व क्रांतिकारकांचा मार्ग मोकळा झाला व ते पुढे निघाले.

 

आणि मग …

लगेच श्री. व्यंकटराव धोबी आणि त्यांचे

सहा साथीदार हे पायी पळत डांगु्र्णे या गावी

येऊन पोहोचले. डांगुर्णे येथे त्यांनी एका शेतात

मुक्काम केला.कैलासगीर महाराज डांगुर्णे यांनी त्यांना जेवण पुरविले. ( त्या काळात काही आजच्या सारखे रस्त्यात हॅाटेल्स नव्हते. कोणी दिले तरच जेवण मिळत असे.)

सकाळी अकराच्या सुमारास श्री. व्यंकटराव

धोबी आणि त्यांच्या साथीदारांनी डांगुर्णे गावाजवळ खजिना घेऊन जाणारी …..

बी . वाय . पी. ४२२ ही मोटार अडविण्याचा

प्रयत्न केला, पण मोटार चालकाच्या काय लक्षात आले कुणास ठाऊक ! त्याने गाडी

एकदम रस्त्याच्या कडेला वळवली.आणि खजिना घेऊन जाणारी बी.वाय.पी.४२२ ही गाडी पुढे चिमठाण्याकडे निघून गेली .श्री. व्यंकटराव धोबी आणि त्यांच्या साथीदारांचा डांगुर्णे गावाजवळ खजिना लुटण्याचा कार्यक्रम अयशस्वी झाला . उरलेले आठ क्रांतिकारक डॅा. उत्तमराव पाटील,श्री. शंकरराव माळी,श्री.नागनाथ नाईकवडी,श्री.

जी. डी. लाड,श्री. निवृत्ती उर्फ रावसाहेब कळके,श्री.धोंडीराम तुकाराम माळी(मला आठवते, आप्पांचे शेवट पर्यंत यांच्याशी संबंध व येणे जाणे होते. ते कुपवाडला रहात. आप्पा त्यांच्या कडे मुक्कामाला जात असत.)श्री. किसन मास्तर,श्री. रामचंद्र भाऊराव पाटील. गोंदी. जि. सातारा.हे सकाळी दहाच्या सुमारास चिमठाणे येथे पोहोचले.

 

चिमठाणे येथे पोहोचल्यावर या आठ पैकी

चौघे श्री. शंकर पांडू माळी,श्री. नागनाथ

नाईकवडी,श्री.जी डी लाड , व निवृत्ती कळके

गावाच्या चढतीवर उभे राहून आपापसात मारामारी करीत त्यांनी दारूड्याची सोंगे आणून त्या मार्गाने जाणारी प्रत्येक मोटार थांबवायची असे ठरले होते.त्या प्रमाणे हे चौघे आपले ठरलेले काम करीत राहिले. खजिना घेऊन जाणारी गाडी साडे अकरा वाजता चिमठाणे येथे पोहोचली. चिमठाणे

येथे चहापानासाठी काही मंडळी खाली उतरली. तेंव्हा तेथे हजर असलेले चार ही क्रांतिकारक मोटारीत जाऊन बसले. थोड्या वेळाने गाडीत बसलेले पूर्वीचे पॅसेंजर तेथे आले.त्यांच्यात व क्रांतिकारकात भांडण झाले. कंडक्टरने गाडीत जागा नसल्याने चारही क्रांतिकारकांना खाली उतरवले.आम्हाला लग्नाला जायचे आहे , तेंव्हा

कसेही करून आम्हाला गाडीत घ्या अशी विनंती डॅा. उत्तमराव पाटील यांनी कंडक्टरला केली. शेवटी कंडक्टर व क्रांतिकारक यांच्यात तडजोड होऊन तिघांनी गाडीतून जावे असे ठरले. डॅा. उत्तमराव पाटील मागे राहिले.

 

त्या प्रमाणे तिघे गाडीत बसले आणि मोटार

चालू झाली. साळवे गावाजवळ मोटार येताच

ड्रायव्हरला रस्त्यात चौघे मारामारी करीत

असल्याचे दृश्य दिसले. आणि तो सावध झाला . कारण हाच अनुभव त्याला डांगुर्णे

गावाजवळ आला होता.त्याने गाडीचा वेग कमी

केल्याचे नाटक केले आणि एकदम मोटारीचा

वेग वाढवला. मारामारी करणारे सावध होते.

मोटारीचा वेग पाहताच ते रस्त्याच्या कडेने

पळाले.

 

तोच गाडीतून क्रांतिकारकओरडले,….

“गाडी थांबवा”. ड्रायव्हर गाडी थांबवेना म्हणून

नाईलाजाने क्रांतिकारकांनी ड्रायव्हरवर गोळ्या

झाडल्या.एक गोळी ड्रायव्हरच्या मानेजवळ

लागली.खजिन्याच्या रक्षणासाठी मोटारीत दोन रायफलधारी पोलिस होते. त्यांच्यात आणि क्रांतिकारकात संघर्ष झाला.एक पोलिसही जखमी झाला. आणि मोटार थांबली. पॅसेंजर्सनी मोटारीतून भराभर उड्या मारल्या, पण क्रांतिकाकरांनी ‘म. गांधी की जय ‘ ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्याने पॅसेंजर्सनी ओळखले की खजिना लुटणारे हे दरोडेखोर नसून ‘चले जाव’ आंदोलनातील क्रांतिकारक आहेत.तेंव्हा त्यांनी क्रांतिकारकांना कसलाही विरोध केला नाही….

 

मंडळी, माझ्या वडीलांना व या साऱ्या क्रांतिकारकांना स्थानिक जनतेने सर्व प्रकारचा

भावनिक व प्रसंगी आर्थिक पाठींबाही दिला

म्हणून त्यांचे नीतीधैर्य टिकून राहिले यात तीळ

मात्र शंका नाही.स्थानिक जनतेच्या पाठिंब्या शिवाय अशी महान कार्ये यशस्वी होत नसतात

हे ही तितकेच खरे आहे.

 

राम राम , बाकी आता पुढच्या भागात.

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा