You are currently viewing माजी आम.राजन तेली आणि परशुराम उपरकरांची घर वापसी उबाठाच्या पथ्यावर पडेल का..?

माजी आम.राजन तेली आणि परशुराम उपरकरांची घर वापसी उबाठाच्या पथ्यावर पडेल का..?

*माजी आम.राजन तेली आणि परशुराम उपरकरांची घर वापसी उबाठाच्या पथ्यावर पडेल का..?*

*राणे कुटुंबीयांवर केलेले आरोप राजन तेलींना..तारक की मारक..?*

विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच आमदारकी साठी इच्छुक उमेदवारांची चलबिचल सुरू होती. कुडाळ, कणकवली पेक्षा सावंतवाडी मतदारसंघात याची प्रचिती जास्त येत होती. कारण, कणकवली येथून आपले राजकीय भवितव्य घडविण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधत राजन तेली यांनी सावंतवाडी शहराचा आसरा घेतला आणि सावंतवाडी मधून दोन वेळा विधानसभा लढवून पराभूत झाल्यावर तिसऱ्या वेळी नक्कीच विजयी होऊ असा आत्मविश्वास मनात असतानाच महायुती कडून सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना(शिंदे) गटाला सोडण्यात आल्यामुळे दीपक केसरकर हेच महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्यामुळे तात्काळ राजन तेली यांनी भाजपा सोडून उबाठाची मशाल हाती घेतली.
राजन तेली यांनी यापूर्वी शिवसेनेतून नारायण राणे यांच्या सोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नारायण राणेंनी देखील प्रामाणिक साथ देणाऱ्या राजन तेली यांना काँग्रेस कडून अशक्य वाटणारी विधानपरिषदेची उमेदवारी देत आमदार केले होते. घोडगे सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या राजन तेलींना राणेंनी आमदार करून मानाने राज्याच्या विधानपरिषद सभागृहात बसविले होते. पुढे राणेंशी मतभेद झाल्यानंतर तेलींनी आमदारकीच्या महत्त्वाकांक्षेमुळे एका रात्रीत राष्ट्रवादी, भाजपा असा प्रवास करत गेली दहा वर्षे भाजपा मध्ये स्थिरस्थावर झाले होते. परंतु नारायण राणे आणि कुटुंबीय भाजपा वासी झाल्यानंतर तेलींना राणेंशी जुळवून घेताना देखील पाहिले..परंतु सावंतवाडी मधून पक्षाची उमेदवारी मिळणार नाही आणि केसरकर – राणे यांची दिलजमाई झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत केसरकरांनी राणेंना मदत केल्यामुळे राणे केसरकरांना पाठिंबा देतील या शक्यतेने राजन तेली यांनी भाजपचे कमळ खाली ठेवत उबाठाची मशाल हाती घेतली. खरंतर सावंतवाडीतून केसरकरांना उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याने राजन तेली यांनी उबाठाशी आधीच जवळीक साधली होती. परंतु तरीही ज्या पक्षाने जवळपास आठ नऊ वर्षे जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले त्या पक्षाला सोडताना कारण काय द्यायचं..? या विवंचनेत “आपण राणे कुटुंबीयांमुळे भाजपा सोडत असल्याचे” सांगून आपल्या महत्वाकांक्षेपोटी राणे कुटुंबाला लक्ष्य करून उद्धव ठाकरेंची वाहवा मिळवली आणि नाहक नारायण राणे यांची नाराजी ओढवून घेतली असे प्रथमदर्शनी दिसत आहे. उबाठा मध्ये आपले वजन वाढवायचे असेल तर राणेंवर टीका केली की उद्धव ठाकरेंची वाहवा मिळते अशीच काहीशी परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. त्यामुळे राजन तेली यांनी देखील तेच सूत्र आपलेसे करून उबाठामध्ये आपले वजन वाढविण्यासाठी सुरुवात केली. सिंधुदुर्गात राणेंना पक्षाकडून जास्त गोंजारले जात आहे, अधिक महत्त्व दिले जाते. लोकसभेसाठी नारायण राणे, देवगड मतदारसंघ नितेश राणे, कुडाळ मधील निलेश राणे आणि सावंतवाडी देखील राणेंच्या मर्जीतील दीपक केसरकरांना उमेदवारी दिली जात असल्याने पक्षाकडून आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप तेलीनी केल्याने राणेंचे समर्थक कार्यकर्ते चिडले आहेत. निलेश राणे यांनी तेलिंना सूचक इशारा देखील दिला. सावंतवाडीतील राणे समर्थक संजू परब यांनी देखील “राणे कुटुंबावरील टीका सहन केली जाणार नाही” असा इशारा दिला. त्यामुळे राणेंना दुखावून पर्यायाने भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली असून राजन तेली यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघात शिवसेनेची पारंपारिक मते आहेत. बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक आजही मतदारसंघात आहेत.
पण, राजन तेली यांना शिवसेनेत प्रवेश देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने तेलींच्या स्वागतासाठी सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ उपस्थित राहिले नाहीत. वेंगुर्ला तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठामधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजन तेली यांचे उबाठामध्ये येणे हे “कहीं खुशी कहीं गम” अशाच प्रकारचे नाट्य दिसत आहे. तसेच मनसेचे नेते आणि नारायण राणे यांच्या शिवसेना पक्ष त्यागानंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी पेललेले माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देखील उबाठामध्ये प्रवेश करून घरवापसी केली. परंतु मनसेपासून सुद्धा गेली काही वर्षे अलिप्त राहिल्याने जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला गेलेल्या उपरकरांची म्हणावी तेवढी ताकद जिल्ह्यात राहीलेली नाही. काही किरकोळ पदाधिकारी वगळता त्यांच्या पाठीशी जनाधार शिल्लक राहिलेला नाही. परिणामी उबाठाच्या नेत्यांना राजन तेली आणि परशुराम उपरकर यांच्या येण्याने पक्षाला बळकटी मिळेल किंवा राजन तेलींना उमेदवारी मिळाली तरी ते सहज निवडून येतील अशी अपेक्षा करणे काहीसे धाडसाचे होईल.
दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील तिन्ही जागा या महायुतीने जिंकणे आवश्यक असून सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी रहावे अशा कानपिचक्या दिल्याने रवींद्र चव्हाण यांची भूमिका दीपक केसरकर यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. मागील काही निवडणुकांचा आढावा घेतल्यास रवींद्र चव्हाण यांची भूमिका जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरत आलेली आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा पाठिंबा मिळाल्यास महायुतीच्या केसरकरांना निवडणूक सोपी जाणार. त्याचबरोबर निलेश राणे हे शिवसेना शिंदेगटात प्रवेश करून कुडाळ मतदारसंघातून लढण्याची शक्यता असल्याने आणि दीपक केसरकर यांनी खासदारकीच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे नारायण राणेंचे काम केल्याने राणे समर्थकांचा पाठिंबा देखील केसरकरांना मिळण्याची अपेक्षा आहे. कारण कुडाळमध्ये देखील केसरकर यांना मानणारे कार्यकर्ते आहेत ज्यांचा पाठिंबा निलेश राणेंना मिळण्यासाठी एकमेकांना साथ देण्याशिवाय पर्याय उरत नसल्याने महायुती म्हणून तिन्ही मतदारसंघ लढल्यास नक्कीच महायुतीचा विजय होईल यात दुमत नाही.
एकीकडे राजन तेली यांनी महाविकास आघाडीकडून आपण लढणार म्हटले तरी गेली चार पाच वर्षे सावंतवाडीच्या कन्या राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी सावंतवाडीतून लढण्याची जय्यत तयारी केल्याने व सावंतवाडीच्या गांधी चौकात जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता ऐनवेळी उमेदवारी मागे घेणे म्हणजे जिल्ह्यातून राष्ट्रवादी स्वतःच संपविण्यासारखे आहे. भविष्यात राष्ट्रवादीला सावंतवाडीतच नव्हे तर जिल्ह्यात डोके वर काढायला जागा उरणार नसल्याने महाविकास आघाडीकरिता माघार घ्यावी का..? हा प्रश्न उपस्थित होणार असल्याने पक्ष हित पाहून निर्णय घ्यावा लागेल. जरी राष्ट्रवादीने पक्षादेश किंवा महाविकास आघाडी टिकण्या करिता माघार घेतली तर कार्यकर्ते मनापासून विश्वासघात केलेल्या उबाठाच्या राजन तेलींना मदत करतील का..? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनापासून प्रचारात उतरतील का..? असे प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहेत.
उबाठाने राजन तेलीना प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची योजना आखल्याने साहजिकच ज्या काँग्रेसने तेलींना आमदारकी दिलेली आणि त्याच काँग्रेसला झिडकारून तेली भाजपवासी झाले. त्याच राजन तेलींना सर्व विसरून मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते निवडणुकीत मतदान करतील का..?
जोपर्यंत राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या तोपर्यंत काँग्रेस शांत होती. आघाडी म्हणून मदत करण्यास तयार होती. परंतु शिवसेनेने खेळलेल्या डावात काँग्रेस घायाळ झाली आणि मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. वेंगुर्ल्याच्या विलास गावडे यांनी विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजन तेली यांच्यासमोर काँग्रेसचे नवे संकट येऊन पडले. त्यामुळे तेली यांचे पूर्वीचे समर्थक किती साथ देतात, उबाठाचे नाराज शिवासानिक काय भूमिका घेतात, राष्ट्रवादी आपली भूमिका काय जाहीर करते आणि काँग्रेस अपमान विसरुन राजन तेली यांना मदत करील का…? यावरच महाविकास आघाडीच्या राजन तेली यांचे भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा दीपक केसरकर यांचा चौथा विजय हा निश्चित मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा