You are currently viewing विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार पुढील शिक्षण निवडावे – वैशाली मणेरकर

विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार पुढील शिक्षण निवडावे – वैशाली मणेरकर

विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार पुढील शिक्षण निवडावे – वैशाली मणेरकर

देवगड येथे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड

विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेनुसार पुढील शिक्षण निवडायचे असते. व्यवसाय, नोकरी करण्यासाठी विषय निवडून आत्मियतेने त्या विषयात आपण झोकून दिले पाहिजे. व्यवसाय व नोकरीचे अनेक दरवाजे आपल्यासाठी ठोठावत असतात, असे मत तज्ज्ञ मार्गदर्शक व समुपदेशक वैशाली मणेरकर यांनी व्यक्त केले.

येथील साईगणेश मंगल कार्यालय येथे दीक्षित फाऊंडेशन व कुशल अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने कै. नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ करिअर मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. यावेळी दीक्षित फाऊंडेशनचे निरंजन दीक्षित, केवल ठाकुरदेसाई, पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, माजी मुख्याध्यापक नारायण माने, व्यवसाय करिअरचे तज्ज्ञ मार्गदर्शक जयंत मणेरकर, पडेलचे माजी सरपंच विकास दीक्षित आदी उपस्थित होते. करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन केवल ठाकुरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

मणेरकर पुढे म्हणाल्या, व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय व उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील शिक्षणाची वाटचाल केली पाहिजे. उद्दीष्ट नजरेसमोर असल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. अनेक व्यवसायाचे मार्ग आपल्यासमोर असतात. व्यवसायाची निवड करताना विद्यार्थी विचलित होतात. असे न करता आपल्याला ज्या व्यवसायात आवड आहे, त्याच व्यवसायाची आपण अचूकपणे निवड केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जयंत मणेरकर यांनीही दहावीनंतर आपण काय केले पाहिजे, याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला गिर्ये, पडेल, विजयदुर्ग, वाडा पंचक्रोशीतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दीक्षित फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगल्भ बनविण्याच्या दृष्टिकोनातून व देवगड तालुक्यातून सनदी अधिकारी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून निरंजन दीक्षित हे नेहमीच नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांबाबत राबवित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा